बॉलिवूडमधील सर्वात जुना आणि प्रसिद्ध अशा आर. के. स्टुडिओला आज दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझविण्यासाठी सहा अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाच पाण्याचे टँकर बोलवण्यात आले. आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी बरेच नुकसान झाल्याचे कळते. या स्टुडिओमध्ये पहिल्या क्रमांकाच्या स्टेजवर ‘सुपर डान्सर’ या डान्स रिअॅलिटी शोचा स्टेज होता. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आधी पडद्यांना आग लागली आणि त्यानंतर संपूर्ण स्टेज जळून खाक झाला.

वाचा : आर. के. स्टुडिओला लागलेल्या आगीने जुन्या जखमा झाल्या ताज्या

आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कपूर कुटुंब स्टुडिओजवळ येणार असून, तत्पूर्वी ऋषी कपूर यांनी या घटनेविषयी ट्विट करून आपले दुःख व्यक्त केले. ‘आर. के. स्टुडिओला लागलेल्या आगीत आम्ही आयकॉनिक स्टेज गमावला. मला याचे खूप वाईट वाटते. पण सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.’, असे त्यांनी लिहिलंय.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिवंगत राज कपूर यांनी १९४८ साली चेंबूर येथे आर. के. स्टुडिओची स्थापना केली. या स्टुडिओने ‘आग’ या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘बॉबी’, ‘मेरा नाम जोकर’, ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’, ‘प्रेमगंथ’, ‘आ अब लौट चले’ यांसह अनेक चित्रपटांची निर्मिती या स्टुडिओने केली. त्यापैकी ‘श्री ४२०’ आणि ‘एक दिन रत्रे’ (बंगाली) या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

वाचा : VIDEO मद्यधुंद अवस्थेत मोदींविरोधात बरळला हा अभिनेता