‘टोनी स्टार्क ’, ‘आयर्न मॅन’ आणि ‘रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर’ या तीन नावांमध्ये प्रतिमा कोणती आणि खरी व्यक्ती कोण हे कळू नये इतके हे समीकरण प्रेक्षकांच्या मनात घट्ट आहे. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर या नावाचा उल्लेख जरी झाला तरी अहंकारी, थोडासा आत्मप्रौढी, पण अत्यंत हुशार असा टोनी स्टार्क  पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतो. तो ‘आयर्न मॅन’ आहे, सुपरहिरो म्हणून त्याची ‘आयर्न मॅन’ ही प्रतिमा लोकप्रिय असली तरी टोनी स्टार्क  ही त्याची मूळ व्यक्तिरेखाच इतकी गमतीशीर आहे की ती लोकांना जास्त भावते. टोनी स्टार्क  आपल्या ‘आयर्न मॅन’ रूपात पुन्हा एकदा माव्‍‌र्हल्सच्या आगामी ‘अ‍ॅव्हेंजर्स : एज ऑफ अल्ट्रॉन’ या सिक्वलपटातून लोकांसमोर येणार आहे. ‘अ‍ॅव्हेंजर्स’च्या या दुसऱ्या पर्वात आपण या टीमशी खऱ्या अर्थाने जोडले गेलो आहोत, असे मत रॉबर्ट डाऊनीने व्यक्त केले आहे.
टोनी स्टार्क ही व्यक्तिरेखा ‘अ‍ॅव्हेंजर्स’च्या दुसऱ्या सिक्वलपटात कशी पुढे न्यायची हा विचार माझ्याही मनात घोळत होता, असे तो म्हणतो. म्हणजे ‘अव्हेंजर्स’मध्ये सगळ्या सुपरहिरोंनी पहिल्यांदाच जमवलेल्या टीममध्ये त्यांच्यातलाच एक होऊन काम करणं हे आव्हान होतं. पडद्यावरही ते अफलातून रंगवण्यात आलं. ‘आयर्न मॅन ३’मध्ये टोनी स्टार्कने आपला जीव तंत्रज्ञानाच्या हवाली केला आहे. त्यामुळे आता पुढे काय, हा मलाही पडलेला प्रश्न होता. मात्र तो ‘अ‍ॅव्हेंजर्स’चा दिग्दर्शक जॉस व्हेडनने खूप चांगला सोडवला आहे, असे रॉबर्ट म्हणतो. टोनी स्टार्क हा मुळातच हुशार आहे. न्यूयॉर्क शहरावरती घोंघावणारं नवं संकट त्याला आधीच जाणवलं आहे. पण या वेळी कुठल्याही पद्धतीची असंघटित लढाई न लढता काहीशी ‘स्टार वॉर्स’ पद्धतीची लढाई लढण्यात टोनीला रस आहे आणि त्याने त्याला ‘अल्ट्रॉन’ असं नाव दिलं आहे. जॉसने ज्या पद्धतीने या कथेची मांडणी ‘अ‍ॅव्हेंजर्स : एज ऑफ अल्ट्रॉन’मधून केली आहे ती फार भव्य आणि वेगळ्या पद्धतीची आहे, असे रॉबर्टला वाटते.
सुपरहिरोपटांच्या मालिका हॉलीवूडला नवीन नाहीत. प्रेक्षकांनाही या चित्रपटांची सवय झाली आहे. अशा वेळी या प्रेक्षकांना धरून ठेवण्याची तुझी युक्ती काय असते, यावर अशा प्रकारच्या चित्रपटांसाठी तुम्ही प्रेक्षकांच्याच मनातून विचार केला पाहिजे आणि तुमची मांडणी मात्र त्यांच्या विचारांच्या पुढची असली पाहिजे, असं प्रतिपादन रॉबर्ट करतो. सुपरहिरोपटांची मांडणी करताना आम्ही सगळेच कलाकार, तंत्रज्ञ प्रेक्षकांसारखा विचार करतो. एखादी गोष्ट तुमच्यासमोर आहे, त्याची कल्पना करताना प्रेक्षक कोय म्हणतील.. अरे! हे तर मी आधीही पाहिलेलं आहे. मग हा विचार प्रेक्षक म्हणून माझ्या मनात पहिल्यांदा आला असेल तर त्यात नवीन काय, हे शोधून काढण्याचा आणि समोरच्याने कल्पनाही केली नसेल अशी त्याची मांडणी करणं हे पुढचं पाऊल असतं, असं तो म्हणतो. सुपरहिरोपट बघताना प्रेक्षक म्हणून माझ्या परिचयाच्या अशा काही जागा असतात, त्या पाहिल्या की मी सुखावतो. पण एक कलाकार म्हणून सांगायचं तर पाच-दहा वर्षांपूर्वी जे सुपरहिरोपट होते, तशा प्रकारचे चित्रपट आता चालणं शक्य नाही. आता सुपरहिरोपट आणि त्यांच्या मालिका बनवणं हे खूप आव्हानात्मक झालं आहे आणि त्यासाठी तुमची कथा असेल, त्याची मांडणी-तंत्र, शैली, अभिनय या सगळ्याच बाबतीत प्रचलित गोष्टींच्या चार पावलं पुढे असणं ही मोठी गरज आहे. त्यामुळेच आता असे चित्रपट बनवणं हे अधिक अवघड झालं असल्याचं मत त्यानं व्यक्त केलं.
दिग्दर्शक म्हणून ‘अ‍ॅव्हेंजर्स’च्या पहिल्या चित्रपटापेक्षा ‘अ‍ॅव्हेंजर्स : एज ऑफ अल्ट्रॉन’च्या निमित्ताने दिग्दर्शक जॉसशी आपली अधिक मैत्री झाली असल्याचे त्याने सांगितले. जॉस खरंच खूप स्मार्ट आहे. चित्रीकरणाच्या वेळी असं व्हायचं की क थेच्या संदर्भातून एखादं दृश्य रंगवताना काय गोष्टी करायच्या, यावर आमच्यात खूप खल व्हायचा. अमुक एक गोष्ट के ली की हे दृश्य असं दिसेल, यात आणखी काय हवंय.. या विचारप्रक्रियेदरम्यान कधी कधी अरे, आपल्याला काय नेमकं दाखवायचं आहे, हे लक्षात येऊ  नये इतपत आमचा गोंधळ उडायचा. मात्र प्रत्येक गोष्टीला, अडचणींना पर्याय असतो. आमच्या दिग्दर्शकाकडे ते सगळे पर्याय तयार असायचे. त्यामुळे चर्चेतून काहीतरी वेगळं घडवणं ही त्याची खासियत आहे, जी मला सर्वात जास्त भावते, असं रॉबर्टने सांगितलं.
एकाच व्यक्तिरेखेतून लोकांसमोर पुन्हा पुन्हा येणं या प्रक्रियेत आता आपण रमलो आहोत, असं तो सांगतो. चित्रपट असोत नाहीतर कुठलीही गोष्ट असेल, तुमच्या आयुष्यातली तुमची पहिली वेळ, तुमचा पहिला चित्रपट हे तुम्ही कधीच विसरू शकत नाही. ‘आयर्न मॅन २’, ‘अ‍ॅव्हेंजर्स’, मग ‘आयर्न मॅन ३’ असं आपलं आयुष्य पुढे पुढे जात आहे, अशी एक भावना होती. ती आजही आहे. पण ‘माव्‍‌र्हल्स’च्या व्यक्तिरेखा आणि त्यांचे चित्रपट यांचा विचार करता तेवढाच एक संकुचित विचार उरत नाही. तुम्ही त्या विश्वात रमलेले असता. माझ्यासाठी एक एक सिक्वलपट म्हणजे एक युग संपलं, दुसरं सुरू झालं.. अशी काहीतरी छान आणि वेगळी भावना आहे, असं सांगणाऱ्या रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरला ‘अ‍ॅव्हेंजर्स : एज ऑफ अल्ट्रॉन’मधून पुन्हा एक वेगळा टोनी स्टार्क आणि अ‍ॅव्हेंजर्सच्या टीमचा वेगळा पराक्रम पाहायला लोकांना खूप आवडेल, असा विश्वास वाटतो आहे.