बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ऐन बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच पांडे यांनी निवृत्ती घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पांडे कोणत्या मतदारसंघातून आणि कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबद्दलची चर्चा सुरू असतानाच त्यांच्याविषयीचं एक गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. रॉबिनहुड बिहार के असे या गाण्याचे बोल आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचं नाव चर्चेत आलं होतं. विशेषतः मुंबई पोलीस व अभिनेत्री रिया चक्रवर्तीबद्दल पांडे यांनी केलेल्या विधानावरून त्यांचं नावं माध्यमांमध्ये झळकायला लागलं होतं. तेव्हापासूनच पांडे हे बिहार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी अचानक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

गुप्तेश्वर पांडे यांची बिहारमध्ये लोकप्रियता वाढताना दिसत आहे. पांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर लगेच हे यू ट्यूबवर रिलीज करण्यात आलं. हे गाणं बिग बॉसमधील स्पर्धक दीपक ठाकूर यांनी तयार केलं असून, त्याला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. गुप्तेश्वर पांडे यांची गुन्हेगारांवर कशी वचक होती, हे गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दीपक ठाकूर यांनी हे गाणं लिहिलं आहे. या गाण्याला निखिल शांतनु यांनी संगीत दिलं आहे.

आणखी वाचा- “व्हायचं तर आयपीएस, त्यापेक्षा कमी नाही”, आई-वडिलांसोबत झालेल्या ‘त्या’ अन्यायामुळे गुप्तेश्वर पांडेंनी केला निर्धार

स्वेच्छानिवृत्तीनंतर काय म्हणाले होते पांडे?

“मी आता डीजीपी राहिलेलो नाही. त्यामुळे आता माझ्यावर सरकारी बंधनं नाहीत. बक्सर, जेहानाबाद, बेगुसराई आणि इतर अनेक जिल्ह्यांमधून लोक मला भेटण्यासाठी येत आहेत. कशा पद्धतीने त्यांची सेवा करुन शकतो याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करुन नंतर निर्णय घेणार आहे. निवडणूक लढणार असं मी कधी सांगितलं. “मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. जेव्हा मी करेन तेव्हा मी सांगेन. पण लोकांची सेवा करण्यासाठी राजकारण हा एकमेव मार्ग नाही,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.