मोक्ष’ या रॉक  बँडने  अस्सल मराठी तडका देऊन रॉक म्युझिकच्या क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे.  पाच मराठी मुलांनी एकत्र येऊन तयार केलेल्या  ‘मोक्ष’ या  पहिल्या  मराठी रॉक बँडच्या भन्नाट  संगीताची जादू आगामी  ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ या मराठी  सिनेमातून  प्रथमच  प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे.
‘मोक्ष’ बँडच्या ‘स्वराज्य’ या पहिल्या अल्बमला जोरदार  प्रतिसाद मिळाला होता.  त्यानंतर त्यांनी ‘मेटल रागा’ या हटके  कार्यक्रमात नऊ रागांना कमी कालावधीत बसवून तरुणाईला आधुनिक पद्धतीने  भारतीय रागांची माहिती देखील करून दिली. आगामी ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ सिनेमातील ‘कुणी अचानक… ‘ या प्रेमगीताला त्यांनी  सुरेल  संगीत दिले आहे. यात त्यांनी रॉक म्युझिक आणि कमर्शिअल याचं अनोखं फ्युजन असलेला ट्रक तयार केला  असून त्यासाठी लाइव्ह तबला  आर्टिस्ट आणि सेक्सोफोन आर्टिस्ट यांचे सहकार्य घेतले आहे. ‘मोक्ष’ रॉक बँड मधील  ऋग्वेद करंबेळकर (गायक), जिमी अलेक्झेंडर (गिटारिस्ट), श्रेयस जोशी (ड्रमर), पुष्कर कुलकर्णी (किबोर्ड प्लेअर), सागर जोशी (बास  गिटारिस्ट)  या पाच जणांची  टीम संगीतावर नेहमीच नवनवे प्रयोग करून ‘युनिक’ संगीत रसिकांना देण्याचा प्रयत्न करीत  असतं. 

२२ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ चित्रपटात त्यांच्या श्रवणीय  संगीताची झलक ऐकायला  मिळणार आहे. मंदार चोळकर लिखीत  हे गीत बेला शेंडे आणि ऋषिकेश कामेरकर यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं असून अंकुश चौधरी व मधू शर्मा यांच्यावर चित्रित झालं आहे. ‘मोक्ष’ बँडचे मराठी चित्रपटातील हे पदार्पण संगीतप्रेमींना निश्चितच भावेल.