आजच्या तरुणाईला आपलासा वाटणार अॅक्शनपट रॉकी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अग्नी, कर्ज, रोग आणि शत्रू या चार गोष्टी वेळीच नष्ट नाही केल्या तर त्या पुन्हा उद्भवतात,’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. स्वतःच्या अस्तित्वावर, कुटुंबावर आणि प्रेमावर घाला घालायला टपून बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करणारा डॅशिंग रॉकी या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे.पेपरडॉल एनटरटेन्मेंट प्रस्तुत आणि सेवेन सीज् व ड्रीम् विव्हर प्रोडक्शन्स निर्मित ‘रॉकी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक ‘अहमद खान’ यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.
या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणारा अभिनेता नक्की कोण आहे याविषयी गेल्या अनेक दिवसांपासून कलाविश्वात चर्चा रंगली होती. मात्र या ट्रेलरमुळे ही उत्सुकता दूर झाली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत संदीप साळवे हा अभिनेता झळकणार आहे. रॉकीच्या माध्यमातून मी कथानायकाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पदार्पणातच असा अॅक्शनने भरलेला चित्रपट मिळाल्यामुळे माझे पदार्पण दमदार होणार आहे. यापेक्षा दुसरी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट माझ्यासाठी नाही,’असं संदीपने सांगितलं.
‘अॅक्शन, इमोशन, ड्रामा आणि रोमान्स या सगळ्याचे परिपूर्ण पॅकेज असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल’ असा विश्वास हिंदीतले सुप्रसिद्ध नट ‘राहुल देव’ यांनी व्यक्त केला. ‘बागी-२’ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक ‘अदनान ए. शेख’ यांनी ‘रॉकी’ च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत. हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते राहुल देव यांनी एका जोरदार भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठीत काम केले आहे. हा चित्रपट येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 11:26 am