चित्रपटसृष्टीत योगदान देणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी ऑस्कर पुरस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व असते. प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले असते. त्यातही नामांकन मिळालेल्या कलाकारांची हुरहुर काही वेगळीच असते. अशाच एका कलाकाराला एक- दोन नाही तर तब्बल १४ नामांकन मिळाले आणि १३ वेळा ऑस्करने त्यांना हुलकावणी दिली. अखेर त्या कलाकाराचा वनवास संपला असून १४ व्या वर्षी म्हणजेच यंदाच्या ९०व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हा बहुमान पटकावला.

पडद्यामागील या कलाकाराचं नाव आहे रॉजर डेकिन्स. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीमध्ये आतापर्यंत १४ नामांकन त्यांना मिळाले आणि १३ वेळा ते हा पुरस्कार पटकावू शकले नाहीत. सोमवारी लॉस एंजेलिसमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात ६८ वर्षीय डेकिन्स यांना ‘ब्लेड रनर २०४९’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे आज त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
‘मला माझे काम खूप आवडते. मी हे गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे, हे तुम्ही पाहू शकता. माझ्या सहकाऱ्यांमुळे हे काम मला अधिक प्रिय आहे. काही सहकाऱ्यांसोबत मी जवळपास २० वर्षांपासून काम करत आहे. हा पुरस्कार मी त्या सर्वांना समर्पित करतो,’ असे ते पुरस्कार स्वीकारताना म्हणाले.

वाचा : ऑस्करमध्ये का होतेय भगव्या रंगाची चर्चा?

१९९० साली चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी माहितीपटांसाठी काम केले. १९९४ साली ‘द शॉशांक रिडम्प्शन’ या चित्रपटासाठी त्यांना पहिले ऑस्करचे नामांकन मिळाले होते.