‘ब्लफमास्टर’, ‘दम मारो दम’, ‘नौटंकी साला’सारखे चांगले चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक रोहन सिप्पीची सुसाट सुटलेली गाडी अचानकच थांबली. ‘नौटंकी साला’ या चित्रपटानंतर रोहन सिप्पी हे नाव निर्माता म्हणून ‘सोनाली केबल’ या चित्रपटापुरते झळकले. त्यानंतर गेली दोन वर्षे तरी या दिग्दर्शकाने चित्रपटांना हात लावलेला नाही. चित्रपटाचा वारसा घरातच आहे, त्यामुळे त्यापासून लांब राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, सध्या चित्रपटांपेक्षा नव्या डिजिटल माध्यमांत आपल्याला रस असल्याचे रोहन सिप्पी यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले. डिजिटल वाहिनीसाठी खास दोन मर्यादित भागांच्या वेगवेगळ्या मालिकांच्या दिग्दर्शनात रोहन सिप्पी व्यग्र आहे.
‘शोले’ची चाळिशी आणि वडील रमेश सिप्पी यांचा दिग्दर्शक म्हणून येत असलेला नवीन चित्रपट या दोन गोष्टी गेले वर्षभर रोहनसाठी पुरून उरल्या होत्या. ‘शोले’सारखी कलाकृती पुन्हा बनणे अशक्य आहे. माझ्या वडिलांनी दिग्दर्शक म्हणून जे काम केले आहे ते पुन्हा निर्माण करण्याची कुवत आमच्यात नाही. त्यांनी तो इतिहास रचला आणि मला त्यांचा अभिमान वाटतो, असे सांगणाऱ्या रोहनने आपल्याला सध्या नवनवीन माध्यमांसाठी काम करायची इच्छा असल्याचे सांगितले. ‘नौटंकी साला’नंतर खरं तर रोहन सिप्पी लहान मुलांसाठी सुपरहिरोपट बनवणार, अशी चर्चा होती. त्याविषयी काहीही न बोलू पाहणाऱ्या रोहनने आपल्याला आजच्या पिढीचे जास्त कौतुक वाटते, असे सांगितले. लहान मुले ज्या पद्धतीने मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स हाताळतात ते पाहणे फार रंजक आहे. आजची तरुण पिढी ही या नवीन माध्यमांमध्ये रमलेली आहे. त्यांना थिएटरमध्ये येऊन चित्रपट पाहण्यात किंवा टीव्हीवरच्या मालिकांशी काही देणेघेणे नाही. ही पिढी डिजिटल माध्यमांशी जास्त खेळते. त्यामुळे या नव्या माध्यमाबद्दल आपल्याला आकर्षण असल्याचे रोहन सिप्पी यांनी सांगितले.
‘इरॉस नाऊ’साठी दोन मालिकांवर रोहनचे काम सुरू आहे. ‘साइड हिरो’ ही सिटकॉम शैलीतील मालिका आहे ज्यात कुणाल रॉय कपूर आणि कोंकणा सेन शर्मा हे दोघे मुख्य भूमिकेत आहे. नाव ‘साइड हिरो’ असले तरी कुणाल याचा हिरो आहे. स्वत:वरच विनोद करणे हे फार अवघड असते. यात कुणाल त्याचीच काल्पनिक विनोदी आवृत्ती साकारणार आहे, तर ‘इरॉस नाऊ’साठीच केलेल्या दुसऱ्या मालिकेत अभिनेत्री बिपाशा बसू मुख्य भूमिकेत आहे. ‘द क्लाएंट’ असे या मालिकेचे नाव असून बारा भागांच्या या मालिकेत बिपाशा एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ‘राजकीय’ कथेवर बेतलेल्या या मालिकेत पुरुषप्रधान कॉर्पोरेट विश्वात वाट्टेल तसे राजकारण क रून आपली सत्ता कायम राखणाऱ्या उद्योजिकेची भूमिका बिपाशाने केली आहे. या दोन मालिकांनंतर वडिलांच्या ‘सिमला मिरची’ या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू होईल. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून रोहन सिप्पीची नवी खेळी मोठय़ा पडद्यावर पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.