विविधांगी आणि आव्हानात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविणारी अभिनेत्री म्हणजे रोहिणी हट्टंगडी. ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘होणार सून मी या घरची’ या मालिकांमधून त्यांनी त्याच्या अभिनयाची नवीन बाजू प्रेक्षकांसमोर उलगडली. त्यामुळे त्याची लोकप्रियता आता घराघरापर्यंत पोहोचली आहे. त्यातच अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या रोहिणी लवकरच छोट्या पडद्यावरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे वयाची साठीपार केलेल्या रोहिणी या वयातही उत्साहाने काम करताना दिसतात. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये त्यांनी एनर्जेटिक काम करण्यामागचं गुपित सांगितलं.

‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून त्या छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. या मालिकेमध्ये त्या आजीची भूमिका साकारत असून ही आजी सॉलिड एनर्जेटिक आहे. त्यामुळे ही भूमिका साकारत असतानाची एनर्जी कशी आणली हे त्यांनी सांगितलं.

”डॉक्टर डॉन’ या चित्रपटातही मी साकारत असलेली भूमिका आजीचीच आहे. पण, आजवर मी साकारलेली आजी आणि ही आजी यात फरक आहे. ‘डॉक्टर डॉन’मधील आजी एकदम डॅशिंग आणि बिनधास्त आहे. ही आजी, आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घटनांची मजा घ्यावी, आयुष्य झकास पद्धतीने जगावं अशा विचारसरणीची आहे”, असं रोहिणी यांनी सांगितलं.

वाचा : बिग बी- विक्रम गोखलेंचा याराना; एबी आणि सीडी’चं पोस्टर प्रदर्शित

पुढे त्या म्हणतात, “या मालिकेतील आजी एकदम डॅशिंग आणि बिनधास्त असल्यामुळे तिला एनर्जेटिक असणं गरजेचं होतं. त्यामुळे माझ्या भूमिकेला न्याय देण्यासाठी एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला सुद्धा एनर्जेटिक राहणं गरजेचं होतं. त्यामुळे मी तेच केलं. आपल्या आवडीचं कुठलंही काम आपण करत असू, तर आपल्याला थकवा जाणवत नाही. माझं अभिनयाच्या बाबतीत तसंच होतं. स्वतःला कामामध्ये झोकून दिलं, की थकवा, वय वगैरे बाबी विसरायला होतात. माझ्या एनर्जीचं गमक विचाराल, तर ‘आवडीचं काम करताना इतर सर्व गोष्टींचा विसर पडणं”, हेच आहे.

दरम्यान, ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी आणि श्वेता शिंदे पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी त्यांनी चार दिवस सासूचे या मालिकेत एकत्र काम केलं होतं. ‘डॉक्टर डॉन’ ही मालिका१२ तारखेपासून सुरू होत आहे.