19 October 2019

News Flash

Video : प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी रोहित शेट्टीने केला पत्रकाराचा अपमान

या कार्यक्रमात रोहितने एका पत्रकाराला चक्क त्याचा पगारच विचारला.

प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी रोहित शेट्टीने केला पत्रकाराचा अपमान

पैसा वसूल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणारा दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टी ओळखला जातो. ‘गोलमाल’ सीरिज, ‘सिंघम’ हे रोहितचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान गाजले. त्यानंतर आता ‘सिम्बा’ हा चित्रपट तो प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ट्रेलर लाँचचा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात रोहितने एका पत्रकाराला चक्क त्याचा पगारच विचारला.

‘सिम्बा’ चित्रपटाची संपूर्ण टीम ट्रेलर लाँच कार्यक्रमात उपस्थित होती. यावेळी एका पत्रकाराने रोहितला विचारलं, ‘सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओत तू रणवीरवर खूप पैसे खर्च केले असं म्हणालास. तर नेमके किती खर्च केलेस?’ पत्रकाराने अप्रत्यक्षरित्या चित्रपटाचा बजेट किती आहे असा प्रश्न त्यातून विचारला. यावर रोहितने थेट त्या पत्रकाराला तुझा पगार किती आहे असा प्रतिप्रश्न केला. रोहितच्या या प्रश्नावर मंचावर उपस्थित असलेला करण जोहर, सारा अली खान अवाक् झाले. ‘सर कॅमेरा सुरू आहेत,’ असं पत्रकाराने रोहितला म्हटलं. त्यावर तो म्हणाला, ‘हो, कॅमेरा सुरू आहेतच. जर तू तुझा पगार सांगू शकत नाही मग मी माझा बजेट का सांगू?’
पत्रकार आणि रोहित शेट्टीच्या या प्रश्नोत्तरादरम्यान करण काहीतरी पुटपुटला. तुम्हाला काही बोलायचं आहे का असा प्रश्न त्या पत्रकाराने करणला विचारलं तेव्हा त्यानेही नकारार्थी मान डोलावली. चित्रपटाचा बजेट विचारताच रोहित इतका का संतापला याचं कोडं कोणालाच उलगडता आलं नाही.

वाचा : दीपिका म्हणते, या कारणासाठी खासगीत केलं लग्न

रणवीर सिंग, सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘सिम्बा’ हा चित्रपट येत्या २८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अजय देवगण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.

First Published on December 4, 2018 3:14 pm

Web Title: rohit shetty and karan johar insult a reporter at simmba trailer launch