अभिनेता रणीवर सिंगने काही दिवसांपुर्वी ट्विटरवर एक पोस्टर शेअर करुन रोहित शेट्टीसोबत काम करत असल्याचे सांगितले होते. या पोस्टरमुळे चाहत्यांची उत्कंठा प्रचंड वाढली होती. रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग एकत्र येणार असल्याने एकदम धम्माल सिनेमा पाहायला मिळेल अशी आशा चाहत्यांना होती. मात्र तसे काही नसून दोघेही एका जाहिरातीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. पण एखाद्या हॉलिवूड सिनेमाच्या तोडीची ही जाहिरात बनवण्यात आली आहे. ‘रणवीर चिंग रिटर्न्स’ म्हणून ही जाहिरातचे कॅम्पेन करण्यात आले आहे. शेवटी या रणवीर चिंग रिटर्न्सचा पाच मिनिट ३२ सेकंदाची ही जाहिरात प्रदर्शित झाली. चिंग्सच्या वेगवेगळ्या पदार्थांची जाहिरात यात कऱण्यात आली आहे.
‘रणवीर चिंग रिटर्न्स’ ही एक अॅक्शनपॅक्ड जाहिरात असून अॅक्शन सिनेमात वरचष्मा असणाऱ्या रोहित शेट्टीने या जाहिरातीचे दिग्दर्शन केले आहे. ही जाहिरात पाहून तुम्हाला हॉलिवूडचा ऑस्कर विजेता ‘मॅड मॅक्स’ हा सिनेमा आठवल्याशिवाय राहणार नाही. या जाहिरातीत रणवीरचा ग्लॅडिएटर लूक पाहायला मिळत आहे. रणवीर सिंगसोबत या जाहिरातीत अभिनेत्री तमन्ना भाटियादेखील झळकणार आहे. रणवीर सिंग आणि तमन्नाची जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.
जगात होत असलेला अन्नाचा तुटवडा आणि त्यामुळे त्रस्त झालेले लोक यांच्या रक्षणकर्त्याच्या रुपात आलेला रणवीर सिंग त्यांना मदत करणार आहे, असे या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आले आहे. रणवीर सिंगने ट्विटरवर या जाहिरातीचा पहिला ट्रेलर शेअर केला होता.
रणवीर सिंगचा ‘बेफिक्रे’ हा नवा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होत आहे. आदित्य चोप्राचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात रणवीरसोबत वाणी कपूरही दिसणार आहे.