पैसा वसूल आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी ओळखला जातो. ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘गोलमाल’ सीरिजचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलेच हिट ठरले. आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणावं हे एकमेव उद्देश असल्याचं तो सांगतो. सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेण्ड असल्याने रोहित शेट्टीलाही एखादा बायोपिक साकारायचा आहे का असा प्रश्न एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर रोहितने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली.

‘मी जर बायोपिकचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करेन. त्यांच्याबद्दल मी बरंच काही वाचलं आहे. पण या चित्रपटासाठी भरपूर पैसा खर्च करावा लागेल,’ असं तो म्हणाला.

आता शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट म्हटल्यास त्यामध्ये कोणता कलाकार त्यांची व्यक्तिरेखा साकारणार हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला. काहींनी अजय देवगण तर काहींनी रणवीर सिंगचं नाव घेतलं. त्यामुळे भविष्यात रोहित शेट्टीने शिवाजी महाराजांवरील बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आणलाच तर त्यामध्ये कोण त्यांची व्यक्तिरेखा साकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.