अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल मुंबई पोलिसांना आला आणि सर्वांचे धाबे दणाणले. ‘सलमानचं घर पुढील दोन तासांत बॉम्बने उडवणार, थांबवू शकत असाल तर थांबवा,’ असं त्या ई-मेलमध्ये लिहिलं होतं.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ४ डिसेंबर रोजी पोलिसांना हा ई-मेल मिळाला. हा मेल मिळताच पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटकडे धाव घेतली. ‘दबंग ३’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेला सलमान त्यावेळी घरी नव्हता. परंतु, सलमानचे आई-वडिल आणि बहिण घरात होत्या. पोलिसांनी त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवलं. त्यानंतर तीन-चार तास पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाने घरात शोध घेतला. सलमानच्या घरासह संपूर्ण इमारतीचाही पोलिसांनी तपास केला. परंतु, कोठेही बॉम्ब आढळला नाही.

पोलिसांच्या तपासानंतर हा धमकीचा ई-मेल खोटा असल्याचं स्पष्ट झालं. गाझियाबाद इथल्या एका १६ वर्षीय मुलाने ४ डिसेंबर रोजी पोलिसांना हा मेल पाठवला होता. मुलाची माहिती मिळताच मुंबई पोलिसांची टीम गाझियाबादला रवाना झाली. तिथं संबंधित मुलगा नव्हता, पण त्याचा मोठा भाऊ पोलिसांच्या तावडीत सापडला. मोठ्या भावाने लहान भावाला घरी बोलावले. पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस बजावली.

संबंधित मुलाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले आणि त्याच्याविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आले.