|| पंकज भोसले

रोमॅण्टिक कॉमेडी या चित्रप्रकाराची अमेरिकी सिनेमाने जगभरातील अनुकर्त्यां चित्रपटांसाठी धोपटवाट बनवून ठेवली. अगदी आरंभी काळातील चित्रपटांमध्ये नायक-नायिकेच्या आिलगन आणि ओष्टमीलनाच्या भैरवीपर्यंत ओळखविस्तार-समज-गैरसमज-खलकृत्यांच्या पर्दाफाशानंतरचा साक्षात्कार-पुनर्मीलन ही कथाविस्ताराची साखळी सुटलेली पाहायला मिळत नाही. यात साठोत्तरी ते नव्वदपूर्व दशकातल्या हजारो रोमॅण्टिक सिनेमांची जडणघडण झाली आहे.

याच काळात आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये भरभरून रोमान्स या संकल्पनेला जनमर्यादा असल्याने रोमॅण्टिक कॉमेडीच्या पारंपरिक साखळीमध्ये प्रेमबंबाळ गाणी आणि नायक-नायिकांच्या प्रेमाची ज्योत (वगैरे म्हणावे का?) फुलवत ठेवणारा सर्वगुणसंपन्न ‘नारायण’सदृश उपनायक सदैव हजर दिसतो. प्रेमासाठी जीव देणाऱ्या नायक-नायिकांच्या कथाही भारतीय सिनेमाने नेहमी अजरामर केल्या आहेत.

हॉलीवूडमधील या सगळ्या एकसुरी प्रेमाळलेल्या चित्रप्रवाहाला नोरा एफ्रॉन या पत्रकार-लेखिकेने ‘व्हेन हॅरी मेट सॅली’ लिहून उलटसुलट करून टाकले. मग नव्वदोत्तरी काळात अचानक प्रेम-बिम, इश्क-विश्क या शब्दांची घृणा असलेल्या व्यक्तिरेखा तयार व्हायला लागल्या. एकटेपणाचा उत्सव साजरा करणाऱ्या व्यक्तींच्या प्रेमसंकल्पनेवरील खिल्लीचे रूपांतर शेवटाकडे प्रेमाकर्षणात करणाऱ्या नव्या घटकांची साखळी नव्वदोत्तरी प्रेमपटांनी विकसित केली. गळ्याच्या शिरा तट्ट ताणेस्तोवर ‘प्यार तो होना ही था’ किंचाळणाऱ्या गाण्यांचे चित्रपट किंवा ‘दिल चाहता है’ नामक यशस्वी कलाकृतीची मूळं नोरा एफ्रॉनने मशागत केलेल्या कथारोपटय़ातूनच फोफावली आहेत. नायक किंवा नायिकेला शेवटच्या क्षणी होणाऱ्या प्रेमसाक्षात्कारामुळे सुरू होण्याच्या काही सेकंद आधी रेल्वे, विमान, बोट आणि त्यांतून चाललेले आपले प्रेम धावत-गाठत प्रेक्षकांच्या जिवाचा ठोका चुकवून सरळ करण्याची हातोटी सिनेमांनी या काळात विकसित केली.

दोन हजारोत्तर काळातील वीस वर्षांमध्ये मात्र जगभरातील चित्रकर्ते रोमॅण्टिक कॉमेडीची नवी आडवाट शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. दीड तासांचे निख्खळ मनोरंजन करीत कायम लक्षांत राहू शकतील, अशा दीड-दोन डझन आवर्जून पाहाव्या अशा प्रेमसिनेमांमध्ये ‘फाइव्ह हण्ड्रेड डेज ऑफ समर’, ‘प्राइसलेस’, ‘ए लॉट लाइक लव्ह’, ‘एलिझाबेथटाऊन’, ‘आय, ओरिजन्स’ यांची वर्णी लावता येईल. (अर्थातच प्रत्येकाची त्याबाबतची ओळखीच्या चित्रपटांची यादी निराळी असू शकेल) अलीकडेच नेटफ्लिक्ससह इतर माध्यमांवर ‘से माय नेम’ नावाचा ब्रिटिश प्रेमपट दाखल झाला आहे. अलीकडच्या धोपट प्रेमपटांच्या प्रवाहापासून दूर राहण्याची या सिनेमाची धडपड कौतुकास्पद आहे.

‘से माय नेम’ दोन अतिभिन्न पातळ्यांवर सुरू राहतो. यातील पहिली पातळी प्रेमपटाची नवी वाट शोधणारी आहे. मग ते प्रसंगांतील वेगळेपण असो किंवा संवादातून नवा खिल्लीयुक्त विनोद तयार करण्याचे प्रकार असोत. दुसरी पातळी फसणारा दरोडा-चोरी आणि त्यातील तऱ्हेवाईक व्यक्ती यांच्याकडून तयार होणाऱ्या विनोदी चित्रपटांतून बराचसा मालमसाला गोळा करते. अन् या सगळ्यांचा एकत्र मेळ घालून उत्तम मनोरंजनाचे साध्य पूर्ण करते.

चित्रपटाला आरंभ होतो एकमेकांना नावानेही ओळख नसलेल्या स्टॅटन टेलर (निक ब्लड) आणि मॅरी पेज (लिसा ब्रेनर) यांच्या वेल्स बेटांवरच्या एका हॉटेलात प्रेमाच्या उत्कटबिंदूला स्पर्श करण्याच्या क्षणापासून. तनोमीलनानंतरच मनोमीलनाच्या शक्यता शोधू पाहणाऱ्या या अज्ञात जोडप्याच्या खोलीत अचानक दरोडा पडतो. बंदुकीच्या धाकावर अर्धपोशाखी अवस्थेतील भेदरलेल्या जोडप्यापुढे डेक (मार्क बोनर) आणि किपर जोन्स (सेलन जोन्स) हे दोघे भुरटे मौल्यवान वस्तूंची मागणी करतात. गोंधळ आणि वेंधळलेल्या स्थितीत डेकच्या बंदुकीतून गोळी सुटते आणि ती किपर या त्याच्याच सहकाऱ्याच्या पायाला लागते. भुरटय़ांमध्येच वाद सुरू होतात आणि डेकने त्या खोलीतच डॉक्टरला पाचारण करावे असा तोडगा निघतो. मग गोळी लागून जायबंदी बनलेला किपर आपल्याकडील पिस्तुलांच्या आधारे स्टॅटन आणि मॅरीला खोलीत बंधक बनवतो.

स्टॅटन आणि मॅरीच्या मनोमीलनाचा आरंभच वाईट पद्धतीने व्हायला लागतो. स्टॅटनऐवजी मॅरीच मर्दानगी दाखवून जायबंदी किपरला गोत्यात आणते. पण किपरच्या चलाखीमुळे दाखल झालेले पोलीस या जोडप्यालाच कैद करून बसतात. तिकडे पोलीसदप्तरी मॅरीवर असलेल्या महाकाय गुन्ह्य़ांची माहिती झाल्यानंतर पापभीरू स्टॅटनला बराच मोठा मानसिक धक्का बसतो. पण तो कमी म्हणावा इतकी तिच्याविषयीची नवनवी माहिती त्याला पुढे मिळत जाते.

पियानो टय़ुनरचा व्यवसाय करणाऱ्या स्टॅटनचे आयुष्य बेटावर पियानो वाजविणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे दु:खद बनलेले असते. त्यात सोडून गेलेली पत्नी आणि सापडलेल्या हरहुन्नरी प्रेयसी या मधल्या काळात दरोडेखोरांशी दोन हात करण्याची प्रेरणा मिळणे अशक्य होऊन जाते. तरीही चित्रपटात अनेकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या चेहऱ्याशी मिळत्याजुळत्या वाटणाऱ्या निक ब्लड याने भ्रमनिरासी प्रेमिकाची भूमिका उत्तम वठविली आहे.

दरोडेखोराचे ऑपेरा गायन, पोलिसांकडून होणारी चूकभूल, चित्रपटीय प्रेमप्रसंगांची विनोदी संवादातून घेतलेली फिरकी आणि अखेर रोमॅण्टिक सिनेमांच्या न चुकणाऱ्या शेवटाचीही मोडतोड अशा अनेक आडवाटा या चित्रपटाने घेतल्या आहेत. मुबलकतेमुळे सिनेगर्दीत खूप थोर पाहता न येण्याच्या आजच्या काळातला चांगला रॉमकॉम किंवा रॉमेडी म्हणून ‘से माय नेम’ नक्कीच अनुभवता येईल.