मराठवाडा महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठेवा आहे. अनेक राजांची राजवट, निजामशाही येथे नांदली. त्यामुळे येथील भारतीय संस्कृती, धर्म, अर्थ, कलेत विविधता आढळते. हा भूप्रदेश नानाविध कलांनी समृद्ध आहे. मराठवाड्याचे ऐतिहासिक सौंदर्य, संत, सत्पुरुष, मठ, मंदिर, घराणी, गुरुद्वारे, लेण्या, गडकोट, संस्कृती अशी अनेक वैशिष्ट्य. मराठवाड्याच्या या समृद्ध परंपरेत दाखल होत आहे एक नवा मराठी सिनेमा ‘रॉमकॉम’.

मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि अहमदनगरपासून जवळ असलेल्या वैजापूर शहरात या सिनेमाच्या कथेला सुरुवात होते. सिनेमाचे दिग्दर्शन गोरख जोगदंडेनं केलं असून यात नवोदित जोडी मधुरा वैद्य आणि विजय गीते यांच्यासह किशोर कदम, असीत रेड्डी, छाया कदम यांच्या भूमिका आहेत.

Viral Memes : नेटकरी जोमात, अनुष्का कोमात

चित्रपटाचे कथानक हे याच भागातले असल्यामुळे त्यांची बोलीभाषा व इतर सर्व गोष्टी या मराठवाड्यातील वैजापूरशी मिळत्या जुळत्या आहेत. त्यामुळे निर्माते सचिन शिंदे यांनी हा चित्रपट याच भागात चित्रित करण्याचे ठरवले, असे दिग्दर्शक गोरख जोगदंडे म्हणाले.

नेहमीपेक्षा वेगळ्या भागात घडणाऱ्या या चित्रपटाबद्दल कलाकारही उत्सुक असून त्यांच्याही आजवरच्या भूमिकांपेक्षा हटके भूमिका चित्रपटात असल्याचे अभिनेता असित रेड्डीने सांगितले. प्रेमकथा, अॅक्शन आणि विनोद यांचा संगम असलेला प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा चित्रपट म्हणून रॉमकॉम ओळखला जाईल असा ठाम विश्वास मधुरा आणि विजय या नवोदित जोडीला आहे. ‘रॉमकॉम’चे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल, असे निर्माते सचिन शिंदे यांनी सांगितले.