अभिनेता रॉनित रॉयने १९९२ मध्ये ‘जान तेरे नाम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला होता. पण त्यानंतर त्याच्याकडे काहीच काम नव्हतं. पहिला चित्रपट सुपरहिट ठरल्यावर पुढचे चार वर्षे तो बेरोजगार होता. जेवायलाही पैसे नव्हते अशी अवस्था होती. पण या परिस्थितीतही मी आत्महत्या करण्याचा विचार केला नाही, असं म्हणत रॉनित रॉयने त्याचा संघर्ष सांगितला.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझा पहिला चित्रपट त्या काळी २५ आठवडे चालला होता. म्हणजे आताचा १०० कोटी रुपयांचा गल्ला जमवणारा चित्रपट समजा. पदार्पणातच मला एवढं यश मिळालं होतं. पण त्यानंतर सहा महिने मला कामासाठी एकही कॉल आला नाही. पुढच्या तीन वर्षांसाठी मी लहानसहान काहीतरी काम करत होतो आणि १९९६ पर्यंत सर्वच काम हातून निघून गेलं होतं. चार वर्षे मी घरीच होतो. माझ्याकडे छोटी गाडी होती पण त्यात पेट्रोल टाकायला पैसे नव्हते. सिल्वर ज्युबिली चित्रपटानंतरही माझ्याकडे जेवायला पैसे नव्हते. इतका कठीण असला तरी मी आत्महत्या केली नाही. मी कोणावर टीका करत नाहीये. पण प्रत्येकाजण त्याच्या आयुष्यात कधी ना कधी आर्थिक समस्यांना सामोरं जात असतो. पण अशा वेळी आत्महत्या हा काही पर्याय नसतो.”

लॉकडाउनचा मोठा फटका कलाविश्वाला बसला. शूटिंग बंद झाल्याने सर्व कलाकार व पडद्यामागे काम करणारे कर्मचारी घरी बसले आहेत. या काळात नैराश्याने, आर्थिक समस्या असल्याने काही कलाकारांनी आत्महत्या केली. १७ मे रोजी अभिनेता मनमीत ग्रेवालने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर २६ मे रोजी ‘क्राइम पेट्रोल’मध्ये काम केलेली अभिनेत्री प्रेक्षा मेहताने आत्महत्या केली. ती २५ वर्षांची होती.