अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस आर्थिक दृष्टीकोनातून तपास करत नसल्याचा आरोप बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे. गेल्या चार वर्षांत सुशांतच्या बँक खात्यातून तब्बल ५० कोटी रुपये काढले गेले आणि फक्त गेल्या वर्षभरात १५ कोटी रुपये काढल्याचं त्यांनी सांगितलं. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून रियाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर पैसे उकळल्याचाही आरोप केला आहे.

आणखी वाचा- “सुशांतच्या जिवाला धोका आहे हे फेब्रुवारीतच पोलिसांना सांगितलं होतं”

“गेल्या चार वर्षांत सुशांतच्या बँक खात्यात ५० कोटी रुपये जमा केले गेले आणि आश्चर्यकारकरित्या ते सर्व पैसे खात्यातून काढले गेले. एका वर्षात १७ कोटी रुपये त्याच्या खात्यात जमा केले गेले. त्यापैकी १५ कोटी रुपये काढले गेले. हा तपासासाठी महत्त्वपूर्ण विषय नाही का? आम्ही शांत बसणार नाही. आम्ही मुंबई पोलिसांना याबद्दल प्रश्न विचारणार”, असं बिहारचे पोलीस महासंचालक ‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

आणखी वाचा- “… त्यामुळे यात काहीतरी चुकीचं वाटतंय”; बिहारच्या पोलीस महासंचालकांचा मुंबई पोलिसांवर आरोप

पाटणाचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे सुशांतच्या मृत्यू प्रकरणी तपासासाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना सक्तीने क्वारंटाइन करण्यात आलं. याविषयी ते म्हणाले, “सुशांत प्रकरणात मिळवलेले पुरावे आणि शवविच्छेदन अहवाल विनय तिवारी यांच्याकडे सोपवण्याऐवजी त्यांनी अधिकाऱ्याला क्वारंटाइन केलंय. मी कोणत्याही राज्याच्या पोलिसांकडून अशाप्रकारची वागणूक पाहिली नाही. जर मुंबई पोलिसांचा प्रामाणिक दृष्टीकोन असेल तर त्यांनी आम्हाला तपासाची परवानगी द्यायला हवी आणि सहकार्य करायला हवं,”

आणखी वाचा- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या; बिहार सरकारकडून सीबीआय चौकशीची शिफारस

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत सुशांतच्या बँक खात्यातून रियाच्या बँक खात्यात कोणतेही पैसे जमा न झाल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहारांचा तपास मुंबई पोलीस करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.