गेल्या वर्षभरापासून कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे २०१७-१८ या वर्षभरामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच अनिष्का शर्मा, सोनम कपूर या अभिनेत्री विवाहबंधनात अडकल्या त्यानंतर दिपिका पदूकोननेही तिच्या डेस्टिनेशन वेडिंगचं ठिकाण निश्चित केल्याचं पाहायला मिळालं. बॉलिवूडमधील या टॉपच्या अभिनेत्री विवाहबंधनात अडकत असतानाच छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीही विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली मालिका ‘छोटी बहू’ या मालिकेने आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट ठरलेल्या मालिकांमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील छोट्या बहुची भूमिका वठविणारी रुबिना दिलाईकने लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. एक आदर्श, संस्कारी सून यांचे उत्तम उदाहरण या मालिकेतून देण्यात आलं आहे. मालिकेमध्ये संस्कारी सुन हा टॅग मिरविणारी रुबिना आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातही कोणाची तरी सुन होणार असून नुकतंच तिचं वेडिंग रिसेप्शनचं कार्ड व्हायरल झालं आहे.


वेडिंग रिसेप्शन कार्ड

रुबिना येत्या २१ जून २०१८ रोजी विवाहबंधनात अडकणार असून काही दिवसांपूर्वी तिची लग्नपत्रिका व्हायरल झाली होती. त्यानंतर आता तिच्या वेडिंग रिसेप्शनचं कार्ड व्हायरल होत आहे. प्रियकर अभिनव शुक्ला याच्याबरोबर रुबिनाची लग्नगाठ बांधली जाणार असून हा लग्नसोहळा सिमलामध्ये संपन्न होणार आहे. रुबिना-अभिनव यांचा विवाह हिमाचली आणि पंजाबी रितीरिवाजानुसार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लग्नानंतर आपल्या मित्र परिवाराला पार्टी देण्यासाठी रुबिना-अभिनवने एक योजना आखली असून या योजनेनुसार त्यांचे वेडिंग रिसेप्शन मुंबईमध्ये होणार आहे. यावेळी रुबिना आणि अभिनव यांचे जवळचे आणि कलाविश्वातील मित्रमंडळी उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

रुबिना-अभिनव यांच्या वेडिंग कार्डप्रमाणेच त्यांचे रिसेप्शन कार्डही तितकंच सुंदर असल्याचं सांगण्यात येत आहे. या कार्डवर मेरीगोल्ड रंगाच्या फुलांची डिजाईन असून त्याला वुडन टच देण्यात आला आहे. २८ जून रोजी हे नवविवाहित दाम्पत्य त्यांच्या मित्रपरिवाराला एक ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी देणार आहेत.