अभिनेते सतीश कौशिक यांनी नुकताच १९७९ रोजी दिल्लीहून मुंबईमध्ये आले तेव्हाचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ते मुंबई रेल्वे स्टेशनवर उभे असल्याचे दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या फोटोवर कमेंट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. पण रुचिर शर्मा यांनी केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रुचिर शर्मा यांनी सतीश कौशिक यांच्या ट्विटरवर उत्तर दिले आहे. कथा चांगली आहे पण स्टेशनवरची कोका कोला आणि पेप्सीची जाहिरात पाहिल्यावर माझ्यातला इतिहासकार जागा झाला आहे. कारण १९७७रोजी जॉर्ज फर्नांडिस यांनी कोका कोला भारतातून घालवला होता. शिवाय दुसऱ्या स्टॉलवर पेप्सीची जाहिरात आहे. पेप्सी भारतात १९८८ साली आली आणि त्याच्या नऊ वर्षांपूर्वी फोटोतील दुसऱ्या स्टॉलवर त्याची जाहिरात पाहायला मिळतेय. त्यामुळे हा फोटो नक्कीच १९९३नंतरचा असावा? या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यांच्या ट्विटवर सतीश कौशिक यांनी अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.

सतीश यांनी ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर करत ‘अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी पश्चिम एक्सप्रेसने ९ ऑगस्ट १९७९ रोजी दिल्लीहून निघालो होतो आणि १० ऑगस्ट रोजी सकाळी पोहोचलो आणि मुंबईत पहिल्यांदा पाऊल ठेवले. मुंबईने मला काम, मित्र, पत्नी, घर, ओळख, यश आणि जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोण दिला. ज्यांनी मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली त्यांचे आभार’ असे म्हटले होते. त्यावर शेखर कपूर यांनी देखील ट्विट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.