हरयाणा येथील सुप्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील बेगूसराय येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सपना चौधरी कार्यक्रमात डान्स करण्यासाठी पोहोचली असता एकच गोंधळ उडाला आणि धावपळ सुरु झाली. धावपळ सुरु असताना झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे.

15 नोव्हेंबरला आयोजित या कार्यक्रमात परफॉर्मन्स देण्यासाठी सपना चौधरी पोहोचली होती. सपना चौधरीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. सपना चौधरी येताच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि धावपळ सुरु झाली. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनीही लाठीचार्ज सुरु केला.

ही घटना बछवारा पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे जिथे प्रत्येक वर्षी भरौल येथे छठ महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यावर्षीही महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये परफॉर्म करण्यासाठी सपना चौधरी पोहोचली होती.

सपना चौधरीला पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. कार्यक्रम सुरु होताच लोकांनी बॅरिगेट तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

सपना चौधरीच्या कार्यक्रमात अशाप्रकारे गोंधळ किंवा हिंसा होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही बिहार आणि उत्तर प्रदेशात अशा घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये सपना चौधरीचा कार्यक्रम रद्द कऱण्यात आला होता.