मनोज वाजपेयी, स्मिता तांबे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘रुख’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेता म्हणून मनोज वाजपेयीकडे पाहिले जाते. चाकोरीबाह्य सिनेमे स्वीकारणारा अभिनेता अशीही मनोजची ओळख आहे. त्याच्या या वाटचालीत आता मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबेची साथ लाभली आहे.

लता मंगेशकरांची खोट्या सहीद्वारे फसवणूक

वडिलांचा मृत्यू, त्या मृत्युमागची कारणे शोधताना मुलाचा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे. अतानु बॅनर्जी दिग्दर्शीत या सिनेमाची कथा एका त्रिकोणी कुटुंबाभोवती फिरताना दिसते. २.३० मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो यात काही शंका नाही.

१८ वर्षीय ध्रुव (आदर्श गौरव) बोर्डिंमध्ये राहत असतो. घरापासून दूर राहत असल्यामुळे त्याला घरात घडणाऱ्या घटनांबद्दल काहीच कल्पना नसते. अशात अचानक ध्रुवच्या वडिलांचा (मनोज वाजपेयी) एका कार अपघातात मृत्यु होतो. वडिलांच्या मृत्युनंतर ध्रुवचं आयुष्य पूर्णतः बदलून जाते. आपल्या वडिलांचा अपघाती मृत्यु झालेला नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचे त्याला वाटत असते. त्यामुळेच बाबांच्या मृत्युमागचे खरे कारण शोधण्याचा तो प्रयत्न करतो. ध्रुवचा हा संघर्ष म्हणजे या सिनेमाचे कथानक आहे. मनीष मुंद्र यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाला अमित त्रीवेदीने संगीत दिले आहे. २७ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.