हट्टाने आणि मेहनतीने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या आजच्या काळातील कित्येक तरुणी आपल्या आजूबाजूला दिसून येतात. या तरुणींचे प्रतिनिधित्व करणारी अवखळ, अल्लड पण तितकीच जबाबदार ‘रुंजी’ २३ तारखेपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आपल्या भेटीस येत आहे. ‘लोकसत्ता’ या मालिकेचे प्रायोजक आहे.
‘रुंजी’ कथा आहे..मनमोकळ्या स्वभावाची पण, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या एका तरुण मुलीची. तिला काळासोबत चालायला आवडते. अडचणी, अडथळे या शब्दांचे तिला वावडे आहे. तिच्या आजूबाजूला काही चुकीचे झालेले, कोणावर अन्याय झालेला तिला अजिबात सहन होत नाही. ती स्वत: अन्याय सहन करत नाही आणि इतरांनाही सहन करू देत नाही. सौंदर्यक्षेत्रामध्ये काम करणारी ही नायिका तिच्या कामाबद्दलही तितकीच आग्रही आहे.
या मालिकेची निर्मिती महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता यांच्या ‘टेल अ टेल’ या संस्थेने केली आहे. मालिकेचे दिग्दर्शन अवधूत पुरोहित यांनी केले आहे. ‘रुंजी ही आजच्या काळातील मराठी युवावर्ग, त्यांची मानसिकता, स्वप्ने, ध्येय यांना नजरेसमोर ठेऊन बनवण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या तरुणीला ही मालिका नक्कीच आवडेल, याची आम्हाला खात्री आहे, असे मालिकेबद्दल बोलताना ‘स्टार प्रवाह’चे प्रोग्रामिंग हेड जयेश पाटील यांनी सांगितले.
पल्लवी पाटील, तुषार कावळे, सई रानडे यांच्यासारख्या नवोदित कलाकारांसोबतच संजय मोने, वंदना वाकनीस, सुरेखा कुडची, प्रसन्न केतकर या दिग्गज कलाकारांचा समावेश या मालिकेमध्ये करण्यात आला आहे.