बिनधास्त, स्मार्ट, अवखळ पण तेवढीच विनम्र असे विरोधाभासी गुण असणारी अशी आजची तरुण पिढी आहे. त्यांचा स्वभाव, त्यांचे संस्कार आणि प्रत्यक्ष त्यांचे वर्तन या तिन्ही गोष्टींना एकचएक फुटपट्टी लावून मोजता येत नाही. म्हणूनच आजची पिढी पूर्णत: वेगळी आहे आणि त्याला आजच्या तरुण मुलीही अपवाद नाहीत. आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वीपणे करिअर करणारी स्त्री संसारही तितक्याच गोडीने आणि उत्तमरीत्या सांभाळू शकते, हा विश्वास देण्याचा प्रयत्न ‘स्टार प्रवाह’ची नवी नायिका ‘रुंजी’ करताना दिसणार आहे.
महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता यांच्या ‘टेल अ टेल’ या निर्मिती संस्थेची ‘रुंजी’ ही नवी मालिका ‘स्टार प्रवाह’वर दाखल होते आहे. या मालिकेचे दिग्दर्शन अवधूत पुरोहित यांनी केले असून रुंजीची भूमिका पल्लवी पाटील या अभिनेत्रीने रंगवली आहे. पल्लवी पाटील, तुषार कावळे आणि सई रानडे या तीन नवोदित कलाकारांबरोबर संजय मोने, वंदना वाकनीस, सुरेखा कु डची आणि प्रसन्ना केतकर यांच्या या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘रुंजी’ ही व्यक्तिरेखा आजच्या युवावर्गाचे, त्यांची मानसिकता, महत्त्वाकांक्षा, स्वप्न आणि ध्येय यांचे प्रतिनिधित्व करणारी आहे. त्यामुळे ही मनमोकळी, बिनधास्त रुंजी तरुणाईला नक्कीच आवडेल आणि त्यांच्यासाठी एक प्रेरणा बनेल’, असा विश्वास ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख जयेश पाटील यांनी व्यक्त केला. ‘रुंजी’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’वर १३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार दररोज रात्री आठ वाजता प्रसारित होणार आहे.