अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘रुस्तम’ या चित्रपटाची सिनेरसिकांना प्रचंड उत्सुकता लागून राहीली आहे. या आगामी चित्रपटात ‘खिलाडी कुमार’ एका नौदल अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात १९५९ चा काळ साकारण्यात आला असून त्याचा ‘रेडिओ ट्रेलर’ नुकताच लॉंच करण्यात आला आहे. हा ट्रेलर ऐकताना अक्षरश: १९५९ च्याच काळात असल्याची अनुभूती होते. अतिशय प्रभावी अशा या ट्रेलरला रेडिओचे जेष्ठ व सुप्रसिद्ध सूत्रसंचालक अमिन सयानी यांनी आवाज दिला आहे. वैशिष्ट्य म्हणजे अमिन सयानींच्या आवाजात असणारा हा ट्रेलर राहून राहून गतकाळाची आठवण करुन देतो. या ट्रेलरमधील संवाद, त्याचे पार्श्वसंगीत आणि अमिन सयानींचा आवाज असे छान त्रिकूट ‘रुस्तमच्या’ निमित्ताने साधण्यात आले आहे. खुद्द अक्षय कुमारनेही या ट्रेलरबाबत ट्विट करत ‘तुम्ही हा आवाज ओळखलात का?’ असा औत्सुक्याचा प्रश्न केला आहे. ‘रुस्तमच्या’ रेडिओ ट्रेलरसह या चित्रपटाबाबत सिनेरसिकांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे.