स्मरण, सौजन्य –
आज विस्मृतीत गेलेल्या एस. एन. त्रिपाठी या गुणी संगीतकाराचं हे जन्मशताब्दी वर्ष.. सिनेमाच्या झगमगाटी जगात सुमधुर संगीत देऊनही ते नेहमीच दुर्लक्षित राहिले. या जगात असतानाही आणि नसतानाही..
झूमती चली हवा, याद आ गया कोई
बुझती बुझती आग को फिर जला गया कोई..
एकावन्न वर्षांपूर्वीचं मुकेशचं हे अजरामर गाणं. गीतकार लक्षात ठेवण्याची तसदी सहसा घेतली जात नाही, पण शैलेन्द्रच्या या गीताचा संगीतकारदेखील आज विस्मृतीत गेला आहे. तसा तो या जगात असतानादेखील नेहमीच दुर्लक्षित राहिला..
लगता नही है दिल मेरा, उजडे दयार में
किसी की बनी है आलम-ए-नापायदार में..
कितना है बदनसीब ‘जफर’ दफ्न के लिये
दो गज़्‍ा जमीन भी न मिली, कू-ए-यार में!
अबू जफर सियाजुद्दीन महंमद बहादूर शहा जफर अर्थात शेवटचा  व सगळ्यात कमकुवत मुघल बादशहा बहादूरशहा जफर याचं हे काव्य. बादशाही कर्तृत्वापेक्षा सूफी पीर म्हणूनच त्याची आज ओळख आहे. आज जफर हा उर्दूतील अग्रगण्य कवी. गझलकार म्हणून ओळखला जातो. मिर्झा गालिब, दाग ही त्याच्याच दरबारातली रत्नं. १८५७ च्या लढय़ात बहादूरशहा जफरच्या बऱ्याचशा रचना नष्ट झाल्या. पराभवानंतर रंगून येथे विजनवासात ब्रिटिशांच्या कैदेत असताना १८६२ मध्ये मृत्यूशय्येवर रंगून येथेच त्याची कबर बांधण्यात आली. बरीच वर्षे त्या कबरीचा कुणालाच पत्ता नव्हता..
न किसी की आँख का नूर हूँ
न किसी के दिल का करार हूँ..
कोई आके शमा जलाए क्यूँ
मै वो बेकसी का मज़ार हूँ!
१९६० साली आलेल्या ‘लाल किला’ या चित्रपटात जफरच्या दोन्ही रचनांचा समावेश होता. मूळ रचना बऱ्याच मोठय़ा, त्यातील निवडक भाग आपल्यापर्यंत पोहोचला. थेट हृदयाला हात घालणाऱ्या महंमद रफीच्या स्वरात. बासरीची एखादी सुरावट सोडल्यास या दोन्ही गाण्यांत तालवाद्यदेखील नाही. जिथं राज्य केलं, त्या स्वदेशात स्वत:च्या कबरीसाठी दोन वार जमीनदेखील न मिळण्याचं जिव्हारी लागलेलं शल्य जफरला एकांतवासात संभवत होतं, तिथं साथ कुठली, कुठली संगत! हे मर्म जाणणारे या दोन्ही रचनांचेदेखील संगीतकार होते एस. एन. त्रिपाठी. सिनेमाच्या पडद्यावर ही दोन्ही गीतं बहादूरशहा जफर महालात म्हणताना दिसतो. जफरच्या भूमिकेतील एम. कुमार हादेखील आज विस्मृतीत गेलेला कलावंत. (‘मुगल-ए-आझम’मधील मूर्तिमंत मधुबाला सौंदर्याचा आविष्कार म्हणून सादर करताना मूर्तिकार तंतराश किंवा नंतर सलीमला तोफेच्या तोंडी देण्याचा न्याय करणाऱ्या अकबरचा धिक्कार करणारा ऐ मुहब्बत झिंदाबाद- असं थेट सुनावणारा कलाकार आठवा). जयराज, निरुपा रॉय, तिवारी वगैरे इतर कलाकार. दिग्दर्शक नानाभाई भट्, निर्माता बी. एम. व्यास ही सर्वच नावं त्या काळाच्या बी वा सी ग्रेड चित्रपटांशी संबंधित. इतिहास-पुराण-देवीदेवता, जादू चमत्कार अशा विषयासंबंधित पण त्याच  काळच्या कुणाही ए ग्रेड चित्रपटांशी संबंधित संगीतकाराला आपल्या नावावर असावीत असं वाटणारी वरील दोन्ही अजरामर गाणी.
शुद्ध काव्यात्मक, जवळपास वाद्यरहित गाण्यांचा प्रयोग बडय़ा संगीतकारांनीदेखील त्यापूर्वी वा नंतर केला. रफीचीच पटकन आठवणारी गाणी म्हणजे- ‘ये कूचे, ये नीलाम घर दिलकशी के..’, ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है..’ (दोन्ही ‘प्यासा’मधली) वा ‘बिछडम्े सभी बारी बारी..’ (कागज के फूल- एस. डी. बर्मन) वा ‘जाने क्या ढूंढती रहती है ये आँखे मुझमें..’ (शोला और शबनम – खय्याम) अथवा ‘मैं ये सोचकर उसके दरसे उठा था..’ (हकीकत – मदनमोहन) अशी.  (मदनमोहनच्या या गाण्यातील व्हायोलिन प्यारेलालचं तर लक्ष्मी-प्यारेच्या ‘दोस्ती’मधील माऊथऑर्गन आर. डी. बर्मनचा- हे त्या संगीताच्या सुवर्णकाळातील सोनेरी क्षण!)
ऑलटाइम क्लासिक्समध्ये सहज जमा होणारी एस. एन. त्रिपाठींची वरील दोन्ही गाणी. पण त्यांच्या वाटय़ाला ए ग्रेडचे सिनेमे कधीच आले नाहीत. होमी वाडिया, बाबुभाई मिस्त्री, मणीभाई व्यास, शांतिलाल सोनी, नानाभाई भट्ट, चंद्रकांत वगैरे निर्माता-दिग्दर्शकांचा आवडता गुणी संगीतकार म्हणजे एस. एन. त्रिपाठी. मधुर सुरावटींची, बहुतांशी शास्त्रीय बाजाची गाणी सातत्यानं देत राहणं एवढं त्यांना पुरेसं होतं. त्यामुळे त्यांची तशी तक्रारदेखील नव्हती.
‘झूमती चली हवा, याद आ गया कोई..’ (मुकेश, ‘सं. सम्राट तानसेन’ – १९६२), ‘आ लौट के आजा मेरे मीत..’ (मुकेश/लता, ‘रानी रूपमती’ – १९५९), ‘जरा सामने तो आओ छलिये..’ (रफी/लता, ‘जनम जनम के फेरे’ – १९५७), ‘ओ पवन वेगसे उडम्ने वाले घोडम्े..’ (लता, ‘जय चितोडम्’ – १९६१), ‘उनपर कौन करे विश्वास..’ (रफी, ‘कवी कालिदास’ १९५९)
अशी कित्येक लोकप्रिय गाणी देणारे त्रिपाठी चित्रपटाच्या ग्रेडची पर्वा न करता या क्षेत्रात भरपूर रमले. इतके की सव्वाशे ते दीडशे चित्रपट विविध भूमिकांतून आज त्यांच्या नावावर जमा आहेत. ९०वर चित्रपटांचं संगीत, २३ चित्रपटांचं दिग्दर्शन, त्यातील काही स्वनिर्मित, कथा-पटकथा-संवादलेखक, गायक, अभिनेता अशा विविध भूमिकांतून वावरले. तक्रार कधी नव्हतीच. (असा एकमेव हरफन मौला बहुधा एकमेव किशोरकुमार असावा). त्यांच्या बरोबरीने बी आणि सी ग्रेड चित्रपट करीत पुढे ए ग्रेड चित्रपट मिळालेले संगीतकार चित्रगुप्त यांनी एव्हीएमच्या ‘मै चूप रहूँगी’ (मीनाकुमारी- सुनील दत्त) मधील ‘पॅरडी साँग’साठी त्या वेळच्या उदंड लोकप्रिय ‘याहू, चाहे मुझे कोई जंगली कहे..’बरोबर ‘जरा सामने तो आओ छलिए..’ या गाण्याच्या लोकप्रियतेचादेखील उपयोग केला. यापेक्षा वेगळं काय सांगायचं!
आज विस्मृतीत गेलेल्या या गुणी संगीतकाराचं खरं तर सध्याचं जन्मशताब्दी वर्ष. तर याच वर्षी २८ मार्चला पंचविसावी पुण्यतिथी झाली (जन्म १४ मार्च, १९१३, काशी येथे. मृत्यू- २८ मार्च १९८८ रोजी, मुंबई येथे). त्यांचे आजोबा पंडित गणेशदत्त त्रिपाठी काशी येथील संस्कृत विद्यापीठाचे प्राचार्य, तर वडील पंडित दामोदरदत्त त्रिपाठी हे काशीच्याच सरकारी विद्यापीठाचे प्राचार्य. त्यामुळे श्री नाथजींचं शालेय शिक्षण वाराणसी येथे, बी.एस्सी. झाल्यावर अलाहाबाद विद्यापीठातून संगीतविशारद एन.व्ही. भातखंडेंच्या मॉरिस विद्यालयातून, संगीतप्रवीण प्रयागसंगीत समितीतून तर लाइट क्लासिकल शिक्षण लखनौ येथील मैनादेवींकडे झालं. या शिदोरीवर त्यांनी थेट मुंबई गाठली अन बॉम्बे टॉकीजला येऊन मिळाले. व्हायोलनिस्ट म्हणून. पगार रु. १००/- फक्त. त्यांना गायक म्हणून संधी मिळाली ‘जीवननैया’मध्ये. (हा अशोककुमारचादेखील पहिला चित्रपट). ‘ऐरी दैया लचक लचक चलो..’ हे पहिलं गाणं. चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रँझ ऑस्टिन. बाँबे टॉकीज सोडल्यावर पहिला ब्रेक मिळाला सं. दिग्दर्शनासाठी तो १९४१च्या ‘चंदन’साठी. पहिलं गाणं- ‘नन्हासा दिल देती हूँ..’ हे राजकुमारीबरोबर त्यांनी स्वत: गायलेलं युगलगीत होतं. पण पहिलं यश मिळालं १९४३च्या ‘पनघट’मध्ये. प्रथम अभिनय केला ‘रामभक्त हनुमान’मध्ये हनुमानाच्या भूमिकेमध्ये! दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा १९५७चा ‘राम हनुमान युद्ध’.
मुळात शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या त्रिपाठींनी स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील ‘रानी रूपमती’ (१९५९) आणि ‘संगीतसम्राट तानसेन’ (१९६२) हे महत्त्वाचे चित्रपट. त्यांतील शास्त्रीय संगीताला नौशादसारख्यांनीदेखील दाद दिली. जसा नौशादचा ‘बैजू बावरा’ तसा त्रिपाठींचा ‘तानसेन’. त्यात शास्त्रीय संगीत गायकांनादेखील त्यांनी आग्रहाने गायला बोलावलं. ‘रानी रूपमती’तदेखील त्यांनी तसा प्रयोग केला.
‘सप्तसूर तीनग्राम..’ (मन्ना डे), ‘सुधबिसर गयी आज..’  (मन्नाडे-रफी), ‘अब आयी बरखा बहार..’ (मन्नाडे-रफी), ‘टूट गयी रे मनकी बीना..’ (पंढरीनाथ कोल्हापुरे- पूर्णा सेठ), ‘सखी कैसे धरू मैं धीर..’ (लता मंगेशकर), ‘दीपक जलाओ, ज्योती जगाओ..’ (रफी), ‘प्रथमशांतरस जाके..’  (मन्नाडे, मूळ तानसेनची रचना), ‘हे नटराज..’ (महेंद्र कपूर- कमल बारोट, मूळ रचना तानसेन) ही  गाणी असलेला ‘संगीतसम्राट तानसेन’ हा कृष्णधवल चित्रपट. त्यातील एक गाणं ‘घिर घिर के आयो रे मेघा..’ हे रंगीत चित्रित केलं होतं. (जसं ‘मुगल-ए-आझम’ १९६० मधील ‘प्यार किया तो डरना क्या..’ हे नौशादचं गाणं. पन्नास वर्षांनी संपूर्ण ‘मुघल-ए-आझम’ डिजिटली कलर्ड झाला. तर ‘संगीतसम्राट तानसेन’ विस्मृतीत गेला.) ‘रानी रूपमती’ या रूपमती आणि सुलतान बाजबहादूर यांची प्रेमकहाणी मांडणाऱ्या चित्रपटातदेखील अव्वल शास्त्रीय बाज असलेली गाणी होती-
‘बात चलत नई चुनरी रंग डारी..’ (कृष्णराव चोणकर- रफी), ‘उडम् जा माया कमलसे..’ (मन्नाडे), ‘सुन बगीयां में बुलबुल बोले..’ (लता मंगेशकर).
या चित्रपटातीलच ‘आ लौट के आजा मेरे मीत..’, ‘संगीतसम्राट तानसेन’मधील ‘झूमती चली हवा..’ अथवा ‘पिया मिलन की आस रे..’ (लता- पिया मिलन की आस- १९६१) या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील गाण्यांचं संगीत देताना शास्त्रीय बाज सांभाळला होता. कदाचित ही त्यांची शास्त्रीय संगीताची बैठकच तत्कालीन सामाजिक आधुनिक चित्रपटांसाठी मर्यादा ठरली असावी. १९४१ ते १९८५ अशी पंचेचाळीस वर्षांची कारकीर्द (‘चंदन’ ते ‘महासती तुलसी’) असूनही तसे चित्रपट अभावानेच मिळाले. उत्तम गुणवत्तेला योग्य कोंदण लाभणं, हा नशिबाचा भाग. जे लक्ष्मी-प्यारेंना लाभलं. ‘सती-सावित्री’, ‘हरिश्चंद्र तारामती’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘पारसमणी’, ‘आया तूफान’ वगैरे चित्रपटांबरोबर ताराचंद बडजात्यांचा ‘दोस्ती’ मिळणं हे नशीब. त्या संधीची उत्तम गुणवत्तेशी सांगड घालून त्यांनी कुठल्या कुठे झेप घेतली. इथं तुलना नाहीच. तसं विस्मृतीत जाणं कुणालाच चुकलं नाही. कुणी आधी, कुणी नंतर. मागे ठेवलेली गाणी काळाच्या ओघात  टिकणं, एवढंदेखील पुरेसं असतं..
‘यादें’ जागविणाऱ्या ऑर्केस्ट्रांमधून त्या सुवर्णकाळातील गाणी गायली जातातच. पण मध्यंतरी एका ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहसंमेलनात विनामूल्य कला सादर करणाऱ्या तरुणांच्या ग्रुपमधील एक विशीचा तरुण भन्नाट गाऊन गेला –
झूमती चली हवा, याद आ गया कोई..
त्याला मिळालेली दाद, टाळ्या व वन्समोअरवरनं एक जाणवलं की ताऱ्यांच्या या झगमगत्या दुनियेत एस. एन. त्रिपाठी हा भले एक साधा काजवा असेल पण तो स्वयंप्रकाशित असा तेजस्वी काजवा होता, एवढं नक्की.