‘बाहुबली २’ या चित्रपटाने जगभरात सर्वाधिक कमाई करत इतिहास रचला. काहीशे कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने हजार कोटींच्या घरात कमाई केली आहे. आणि चित्रपटाची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ हा चित्रपट ८ ऑक्टोबरला सोनी मॅक्सवर प्रदर्शित होतो आहे. त्यानिमित्ताने, खुद्द राजामौली आणि बाहुबलीची भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेता प्रभासशी मारलेल्या गप्पा..

पाच वर्षे एकाच कथेचे दोन चित्रपट करणे आणि दोन्ही वेळा लोकप्रियता आणि कमाईचं विक्रमी समीकरण जमवणं हे शिवधनुष्य पेलल्यानंतर या चित्रपटाचा तिसरा भागही यायला हवा, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. तिसरा भाग केला तर आम्हाला अजूनही उत्तम बाजारपेठ आहे, यापेक्षाही चांगली कमाई करण्याची संधी आहे. त्यामुळे साहजिकच तिसऱ्या चित्रपटाकडे वळण्याचा मोह दिग्दर्शक म्हणून मला होऊ शकतो. पण ‘बाहुबली’ची सुरुवात करतानाच त्याची कथा अशापद्धतीने लिहिण्यात आली होती की, पहिला भाग एका पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल. दुसरा भाग हा पहिल्याला पुढे नेणारा असला तरी तो त्यापेक्षा जास्त प्रभावी ठरेल. ती कथा आता संपली आहे. त्यामुळे तिसरा भाग करायचा तर काही वेगळीच भन्नाट कथा असायला हवी. जे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे ‘बाहुबली ३’चा विचार आम्ही करत नाही आहोत. सध्या तरी मी सुट्टीवर आहे, असं राजामौली यांनी स्पष्ट केलं. दिग्दर्शक म्हणून एका चित्रपटाला पाच वर्षे दिल्यानंतर त्यातून बाहेर पडणं त्यांना आता शक्य झालं आहे का, या प्रश्नावर ते आता हा चित्रपट संपल्यानंतरचा काळ अधिक गुंतागुंतीचा आहे असं म्हणतात. या चित्रपटातून बाहेर आलो आहोत हे म्हणणं इतकं सोपं राहिलेलं नाही. पण हो.. या चित्रपटाने जे काही निर्माण केलं आहे, जे यश दिलं आहे त्यातून नक्कीच बाहेर पडलो आहे, असं त्यांनी सांगितलं. या पाच वर्षांच्या काळात दिग्दर्शक म्हणून माहेष्मतीचं काल्पनिक साम्राज्य निर्माण करणं जेवढं अवघड होतं त्यापेक्षा सलग पाच वर्ष तीच ऊर्जा स्वत:सह सगळ्यांमध्ये टिकवून ठेवणं हे आव्हान होतं. चित्रपटातील लढाईची दृष्ये चित्रित करण्याचा अनुभवही खरोखरच परीक्षा घेणारा होता. आज मात्र मागे वळून या दोन्ही चित्रपटांकडे पाहताना खूप मजा वाटतेय या सगळ्याची.. अर्थात, चित्रीकरण करतानाही आम्ही खूप मजा केली आहे. तरी हे सगळं जे या चित्रपटाच्या निमित्ताने घडून गेलं आहे त्यातल्या कटू आठवणी, कठीण गोष्टी सगळ्या आम्ही पुसून टाकल्या आहेत. चांगल्या तेवढय़ा आठवणी स्वत:बरोबर ठेवल्या असून त्यावर आमची पुढची वाटचाल सुरू आहे, असं राजामौली म्हणतात.

या चित्रपटाने एक विलक्षण कथाकार म्हणून त्यांना लौकिक मिळवून दिला आहे. व्हीएफएक्स तंत्राचा इतका प्रभावी वापर याआधी भारतीय चित्रपटसृष्टीत कोणी केला नव्हता. करण जोहरसारख्या दिग्दर्शकानेही हे मान्य केलं आहे. मात्र तंत्र आणि कथा या दोन्ही गोष्टी हातात हात धरून पुढे गेल्या पाहिजेत, असं मत ते व्यक्त करतात. मी इंजिन आणि गाडीचं उदाहरण देईन. इंजिन चांगलं असेल तर गाडी धावेल. नुसतंच इंजिन वापरलं ते एकटंच पळेल पण कोणाला फिरवून आणू शकणार नाही. आणि इंजिनाशिवाय गाडी म्हणजे नुसती देखणी वस्तू. ती लांबून पाहायला चांगली वाटली तरी तिचा उपयोग शून्य. त्याच तत्त्वाने तुमची गोष्टच सुंदर असेल तर त्याला उत्तम तंत्राची जोड देता येईल. मला विचाराल तर गोष्ट साठ टक्के आणि तंत्र चाळीस टक्के हे समीकरण योग्य आहे.

फँटसी हा राजामौली यांच्या सगळ्याच चित्रपटांचा मुख्य आधार आहे. जॉनर म्हणून मी फँ टसी चित्रपट के लेले नाहीत. माझा प्रत्येक चित्रपट जॉनर आणि कथेनुसार वेगवेगळा आहे. मी मसाला चित्रपटही केला आहे, मी शास्त्रज्ञाची गोष्टही केली आहे. पण फँटसीचं मला आकर्षण आहे. मी रोजच्या जगण्यातल्या साध्या-साध्या गोष्टींमध्येही फँटसी शोधतो आणि ती त्यानुसार रंगवतो. मला या अशा फँटसीजचं आकर्षण आहे, असं ते मोकळेपणाने सांगतात. आपल्याकडे शंभर-दोनशे कोटींची गणितं मांडून चित्रपटाचा व्यवसाय केला जातो. ‘बाहुबली’ने दोन हजार कोटींचा आकडा गाठला आहे. चित्रपट करताना हे यश अपेक्षित होतं का?, या प्रश्नावर माझ्या दोन्ही चित्रपटांचं बजेट काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे. तो आकडा लक्षात घेता आपला हा चित्रपट किती कमाई क रेल, याचे आडाखेच आम्ही मांडले नव्हते हे म्हणणे धाष्टर्य़ाचे ठरेल, असं ते म्हणतात. दक्षिणेकडे या चित्रपटाची कमाई विक्रमीच असणार ही आमची अपेक्षा होती. आम्हाला धक्का मिळाला तो उत्तरेक डून. तिथे चित्रपट एवढा डोक्यावर घेतला जाईल अशी अपेक्षाच आम्ही केली नव्हती. पण तिथे कमाल झाली. त्या यशामुळे लोकप्रियतेची समीकरणेही बदलली. राजामौलींच्या चित्रपटांनी नेहमीच कमालीचे यश मिळवले असले तरी त्यांच्या स्वभावातला साधेपणा त्यांच्यासाठी नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. दिग्दर्शक म्हणून आपली दृष्टी, मांडणीची पद्धत हे मुख्य अस्त्र आहे. त्यामुळे कथा कशीही असली, कितीही कठीण प्रसंग असला तरी दिग्दर्शक त्यावर आपल्या हुशारीने मार्ग काढतोच हा त्यांचा फंडा आहे. त्यामुळे ‘बाहुबली’च्या भव्य यशानंतरही माणूस म्हणून आपल्यात काहीही बदल झालेला नाही. केवळ खासगीपणा उरलेला नाही, ही त्यांची तक्रार आहे. आता तर उत्तर भारतातही मी माझी ओळख लपवून साधेपणाने फिरण्याचा आनंद अनुभव शकत नाही, अशी मिश्कील खंत ते व्यक्त करतात.

‘बाहुबली’नंतर राजामौली ‘महाभारता’वर चित्रपट करणार, बॉलीवूडच्या दिग्दर्शकांबरोबर काम करणार अशा चर्चाना ऊत आला आहे. मी कु ठेतरी मला ‘महाभारता’ची कथा आवडते. आणि त्यावर चित्रपट करायला आवडेल, असं म्हणालो होतो. पण ते इतकं सोपं नाही. त्यामुळे मी महाभारतावर कुठल्याही प्रकारे काम करत नाही आहे. आणि बॉलीवूडची ऑफर म्हणाल तर ती ‘बाहुबली’च्या आधीपासून मला तशी विचारणा कायम होत राहिली आहे. पण मी याआधीच काही चित्रपटांसाठी शब्द दिलेला होता. गेल्या पाच वर्षांत ‘बाहुबली’मुळे मला त्यांच्यावर काम करता आलेले नाही. त्यामुळे आता ते चित्रपट पहिले पूर्ण करण्यावर माझा भर असेल, असं त्यांनी सांगितलं.

‘बाहुबली’ने खूप काही दिले -प्रभास

बॉलीवूडमध्ये शंभर-दोनशे कोटी केले की तो कलाकार त्या क्लबचा हिरो म्हणून प्रसिद्ध होतो. त्याला मिळणारे चित्रपट, मानधन सगळ्याचाच दर्जा बदलतो. ‘बाहुबली’ने हे सगळंच दिलं आहे याची कल्पना असणारा प्रभास खरं म्हटलं तर सध्या दोन हजार कोटी क्लबचा नायक आहे. पण सध्या तरी तो या स्टारडमपासून सावध अंतर राखून आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटाने खूप काही मिळवून दिलं आहे, हे सांगणारा प्रभास ते खूप काही नेमकं काय आहे हे सांगणं टाळतो. पण कुठेतरी ‘बाहुबली’च्या यशातून बाहेर पडून आता नवी आव्हानं पेलण्याच्या तयारीत आहे हे तो जाणवून देतो. ‘बाहुबली’चं यश हे केवळ राजामौली यांच्या कल्पनेचा, दृष्टिकोनाचा विजय आहे. त्यांनी ते स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात आणलं. त्याला लोकांचा जो प्रतिसाद मिळाला आहे तो अवर्णनीय आहे, असं तो सांगतो. आपल्याकडे हॉलीवूडच्या सुपरहिरोजना आदर्श मानलं जातं. स्पायडरमॅन, आयर्नमॅन यांच्यासाठी आबालवृद्ध वेडे आहेत. पण या चित्रपटाने अमरेंद्रा बाहुबली हा सुपरहिरो ठरला. लोकांच्या विशेषत: लहान मुलांच्या मनात त्याने घर केलं आहे. आणि बाहुबलीच्या रूपात आपण त्यांचे सुपरहिरो आहोत, ही भावना एका कलाकारासाठी खूप आनंदाची असते. मी तो आनंद सध्या अनुभवतोय, असं तो सांगतो. लहान लहान मुलं जेव्हा शिवासारखी शिवलिंग खांद्यावर घेऊन जाण्याचा अभिनय करतात किं वा हत्तीच्या सोंडेवर बाहुबलीच्या स्टाईलमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना मी स्वत: पाहिलं आहे. मला खूप मजा वाटते हे सगळं अनुभवताना असं त्याने सांगितलं. पाच वर्षांनंतर पुन्हा आपल्या मूळ बारीक शरीरयष्टी आणि छोटय़ा केसांची स्टाइल या अवतारात परत आल्याबद्दल तो खूश आहे. सध्या त्याने आगामी ‘साहो’ या चित्रपटावर लक्ष केंद्रित केलं आहे. आणि त्यासाठी श्रद्धा क पूरसारखी अभिनेत्री मिळाल्यामुळे सेटवरही सगळे आनंदी आहेत, असं त्याने सांगितलं. श्रद्धा खूप चांगली अभिनेत्री आहे, मनमिळाऊ आहे. त्यामुळे तिच्याबरोबर काम करणं हा चांगला अनुभव ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करणारा प्रभास सध्या हिंदी शिकण्यासाठीही तिची मदत घेतो आहे. ‘बाहुबली’तून बाहेर पडलो आहे, असंही म्हणता येत नाही पण त्यातून बाहेर पडून आत्ताच्या काळाशी सुसंगत असं काही करण्याची त्याची धडपड या दोन्ही विरोधी भावनांमध्ये तो अडकला आहे. हे त्याच्याशी मारलेल्या गप्पांमधून सहज लक्षात येतं.