News Flash

‘बाहुबली २’ चित्रपटातील दृश्य लीक केल्याप्रकरणी एकाला अटक

'बाहुबली २' या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे चित्रीकरण हैदराबादमध्ये केले गेले आहे.

बाहुबली २

गेल्या वर्षी एका नव्या अंदाजात आणि वेगळ्या धाटणीच्या कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अनुत्तरित राहिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तराची उत्सुकता कायम ठेवत आता लवकरच दिग्दर्शक एस. एस. राजामौली ‘बाहुबली २’ या चित्रपटासह पुन्हा एकदा चित्रपटांचे विक्रम मोडित काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण, चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच एका बातमीने सध्या एकच खळबळ माजली आहे.

सोशल मीडियाचा अवाजवी वापर होणाऱ्या हल्लीच्या दिवसांमध्ये ‘बाहुबली २’ या चित्रपटातील काही मिनिटांचे दृश्य लीक झाल्याची चर्चा आहे. चित्रपटाच्याच एडिटिंग टीममधील एकाने हा व्हिडिओ लीक केल्याची माहिती दिली जात आहे. सदर प्रकरणाची माहिती मिळताच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून आंध्रप्रदेशातल्या विजयवाडा येथून पोलिसांनी एका इसमाला अटक केली आहे. तसेच हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये, यासाठी निर्माते युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

वाचा: ‘बाहुबली २’ ला टक्कर देण्यासाठी अक्षय सज्ज

त्यामुळे येत्या काळात या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येईपर्यंत चित्रपट निर्माते कोणती काळजी घेतात याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे चित्रीकरण हैदराबादमध्ये केले गेले आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचा ट्रेलर अनेकांना आवडला होता. त्यामुळे या दुसऱ्या भागाचा ट्रेलरही अनेकांना आवडेल अशी अपेक्षा सध्या निर्माते आणि दिग्दर्शकांकडून केली जात आहे. ‘बाहुबली’ हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर विदेशातही चांगलाच गाजला होता. बाहुबली या चित्रपटाची लोकप्रियता पाहता त्याच्या पहिल्या भागात अनुत्तरित राहिलेल्या ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाचे उत्तर ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या चित्रपटात तरी मिळणार का? यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 5:31 pm

Web Title: s s rajamoulis bahubali 2 scene leaked producers filed complaint
Next Stories
1 VIDEO: रजनीकांतने राखी सावंतला म्हटले बॉलीवूडची क्वीन
2 ..यामुळे करिना-शाहिदमधील दुरावा संपला
3 लंडनमधील उपहारगृहात शिल्पा शेट्टीच्या नावाने ‘एसएसके स्पेशल’ डिश!
Just Now!
X