‘सारेगमप’च्या पहिल्या पर्वातील लांब केसांचा बारकेलासा गझल गायक आठवतोय.. तोच तो विजय गटलेवार.. त्याच्या खास आवाजामुळे विजय प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला आहे. अनघा ढोमसे, अभिजित कोसंबी, ज्ञानेश्वर मेश्राम यांच्यामुळे काहीसा झाकोळला गेलेला विजय आता संगीतकार म्हणून नवीन ओळख निर्माण करू पाहातोय. सुबोध पवार लिखित व दिग्दर्शित ‘आयत्या बिळावर नारोबा’ या नाटकाचा संगीतकार-पाश्र्वसंगीतकार म्हणून विजय आपल्या नव्या कारकिर्दीची सुरुवात करतोय.
‘सारेगमप’ नंतर विजयचा ‘कुंडली’ हा गझल आल्बम प्रकाशित झाला तसेच ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या हिंदी मालिकेसाठीही त्याने पाश्र्वगायन केले होते. ‘करार केला’ हा मराठी गझलांचा आल्बमही त्याच्या नावावर जमा आहे.
मात्र, आता ‘.. नारोबा’च्या निमित्ताने तो संगीतकार म्हणून पुढे येत आहे. नाटकात तीन गाणी असून त्यात प्रेमगीत, लग्नाचे गाणे आणि थीम सॉंग यांचा समावेश आहे. या नाटकाचे संगीत आणि पाश्र्वसंगीत अशी दुहेरी जबाबदारी विजयकडे आहे.
या नाटकाबरोबरच विजयने संगीत दिलेले ‘राजवाडा’, ‘आम्ही बोलू प्रेमाचे’, ‘चंद्रकोर’ हे तीन मराठी चित्रपट सप्टेंबर २०१४ मध्ये प्रदर्शित होत आहेत.  
नाटक दुसऱ्या आठवडय़ात
साई सेवा प्रतिष्ठान निर्मित आणि गोटय़ा सावंत यांच्या व्ही. आर. प्रॉडक्शनची प्रस्तुती असलेले हे नाटक जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात रंगमंचावर सादर होणार आहे.
नाटकातील ‘नाऱ्या’च्या भूमिकेत ‘फू बाई फू’, ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ या कार्यक्रमातून विनोदी अभिनेता म्हणून आपला वेगळा ठसा उमटविणारा विकास समुद्रे हा अभिनेता आहे.

सारेगमप’मध्ये गायक म्हणून सहभागी झालो होतो. त्याच पर्वात इलाही जमादार यांची एक गझल मी संगीतबद्ध करून सादर केली होती. त्याच वेळी कुठेतरी ‘संगीतकार’ म्हणून काम करावे असे मनात होते. इतक्या वर्षांनंतर आता ते प्रत्यक्षात येत आहे.
    – विजय गटलेवार