News Flash

झी मराठीवर सुरांचा महायज्ञ

मराठी माणसाची संगीताशी नाळ एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने जोडलेली आहे.

‘सारेगमप’ कार्यक्रमाचे नवे पर्व घेऊन आली आहे. ‘घे पंगा, कर दंगा’ असे म्हणत दर सोमवार आणि मंगळवारी हे नवे पर्व सुरू होणार आहे.

मराठी माणसाची संगीताशी नाळ एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने जोडलेली आहे. काहीजण सकाळची सुरुवात आकाशवाणीवरील भक्ती संगीताने तर काही जण मन:शांती अनुभवण्यासाठी शास्त्रीय संगीत ऐकतात. उपनगरी रेल्वेने किंवा ‘बेस्ट’ बसने प्रवास करणारे नोकरदार, वाहतूक कोंडीत अडकलेला प्रवासी कानात हेडफोन घालून गाणी ऐकत असतात. संगीतप्रेमी मराठीजनांसाठी ‘झी मराठी’ वहिनी पुन्हा एकदा ‘सारेगमप’ कार्यक्रमाचे नवे पर्व घेऊन आली आहे. ‘घे पंगा, कर दंगा’ असे म्हणत दर सोमवार आणि मंगळवारी हे नवे पर्व सुरू होणार आहे.

तात्पुरता अल्पविराम घेतलेल्या ‘चला हवा येऊ  द्या’ या कार्यक्रमाच्या ठिकाणी १३ नोव्हेंबरपासून ‘सारेगमप’चे नवे पर्व सुरू झाले. सुरुवातीला राज्यातील विविध केंद्रांवर झालेल्या ऑडिशन दाखविल्या गेल्या. आता स्पर्धकांच्या सहभागाचे हे नवे पर्व सुरू होत आहे. ‘सारेगमप’च्या नव्या पर्वात मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते रवी जाधव, प्रसिद्ध पाश्र्वगायिका बेला शेंडे आणि गीतकार, संगीतकार स्वानंद किरकिरे हे परीक्षक असणार आहेत. तर ‘सारेगमप’च्याच मंचावरून घराघरात पोहोचलेला ‘लिटिल चॅम्प’ रोहित राऊत सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे.

‘सारेगमप’च्या नव्या पर्वाची माहिती देताना स्वानंद किरकिरे म्हणाले, या पर्वात आपल्याला तरुणाईचा सळसळता उत्साह पाहायला मिळणार आहे. या सळसळत्या उत्साहाला वाव देण्यासाठीच या नव्या पर्वाचे नाव ‘घे पंगा, कर दंगा’ असे ठेवले आहे. हे नवे पर्व अल्पकालावधीसाठीच आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांमधील केंद्रांत झालेल्या विविध फेऱ्यांमध्ये हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. यातून निवड झालेल्या स्पर्धकांची ‘मेगा ऑडिशन’ झाली. त्यातून तावून सुलाखून अंतिम ३६ जणांची निवड करण्यात आली असून त्याचे सादरीकरण आता पाहायला मिळणार आहे.

यंदाच्या पर्वात माझ्यासह बेला व रवी आम्ही परीक्षकाची भूमिका पार पाडणार आहोत. मी गाण्यातल्या व चेहऱ्यावरच्या आविर्भावाकडे लक्ष देणार आहे. रवी जाधव हा उत्तम दिग्दर्शक असल्यामुळे तो समोरचा स्पर्धक गाणे कशा पद्धतीने सादर करतो, त्यावर नजर ठेवणार आहे. तर बेला शेंडे ही सुरांवर, आवाजावर आणि गाण्याच्या पट्टीवर लक्ष ठेवणार असल्याचेही किरकिरे यांनी सांगितले.

‘सारेगमप’च्या आजवरच्या पर्वामधून महाराष्ट्राला एकापेक्षा एक चांगले गायक-गायिका मिळाले आहेत. ‘सारेगमप’च्या प्रत्येक पर्वावर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे.  ‘सारेगमप’चे नवे पर्व स्पर्धकांचा सुरेल पंगा, सप्तसुरांचा दंगा उडवून देण्यासाठी सज्ज झाले आहे. दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ वाजता ‘सारेगमप-घे पंगा, कर दंगा’ हे पर्व सुरू होत आहे.

‘झी मराठी’ ने ‘सारेगमप’ या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांगीतिक वाटचालीत नेहमीच महत्त्वाचे योगदान दिले आहे. या उपक्रमातून अनेक उदयोन्मुख गायकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहेत. ‘सारेगमप’च्या नवीन पर्वात, कार्यक्रमाच्या रूपरेषेत काही रंजक बदल करण्यात आले असून रसिक प्रेक्षकांसाठी हे नवे पर्व मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.

-नीलेश मयेकर , झी मराठी, व्यवसायप्रमुख

सारेगमपच्या या नव्या पर्वात परीक्षक ही भूमिका पार पाडण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ऑडिशनच्या दरम्यान आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत दडलेलं टॅलेंट शोधून काढलं जे खरंच आव्हानात्मक ठरलं, कारण आजकालची तरुण पिढी संगीत या कलेबाबत खूप जागरूक झालेली आहे. त्यांचं झपाटून टाकणारं सादरीकरण ऐकून त्यांच्यात डावं-उजवं करणं खूप अवघड आहे. तरीही, जगभरातील संगीतप्रेमींना आपलासा वाटेल असा आवाज या स्पर्धेतून शोधून काढणं आणि  नवा गानरत्न मिळवून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.

-रवी जाधव, परीक्षक, दिग्दर्शक-निर्माते.

सारेगमप हा फक्त एक रिअ‍ॅलिटी शो नसून हा एक सुरांचा महायज्ञ आहे. आपली कला जगासमोर सादर करण्याची सुवर्णसंधी देणारा, मराठी मनांना आपलासा वाटणारा हा मंच आहे. महाराष्ट्रातल्या तरुणाईची ही अफाट ऊर्जा पाहून मी थक्क झाले. स्पर्धकांना मार्गदर्शन करताना, त्यांचे विचार जाणून घेताना मलाही खूप शिकायला मिळतंय. परीक्षकाची ही भूमिका मी खरंच खूप एन्जॉय करतेय. गुणवान स्पर्धक आपल्या गायकीने हा मंच भारावून टाकतील, यात शंकाच नाही. या पर्वात स्वरांचा हा दंगा महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणार एवढं मात्र नक्की.

– बेला शेंडे,  गायिका,

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 1:40 am

Web Title: sa re ga ma pa ghe panga kar danga on zee marathi
Next Stories
1  ‘डान्स रिअ‍ॅलिटी शो’मध्ये मराठी टक्का वाढतोय!
2 हुबेहूब विराट कोहलीसारखा दिसणारा ‘तो’ बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज
3 VIDEOS : असा रंगला भारती आणि आश्काचा मेहंदी सोहळा
Just Now!
X