कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं?  दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होममिनिस्टरचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातील वहिनींपासून ते सेलिब्रिटी सौभाग्यवतींना बोलतं करणाऱ्या या होम मिनिस्टरमध्ये लवकरच अशा ‘ सौं’ ना भेटण्याची संधी मिळणार आहे ज्यांचे ‘अहो’ झी मराठीवरील सारेगमप या कार्यक्रमाचा ‘ताल’ सांभाळतात.

VIDEO : ‘मिस वर्ल्ड’ मानुषीच्या यशात दीपिका पदुकोणचाही वाटा

सारेगमपच्या मंचावरून रसिकप्रेक्षकांना ताल धरायला लावणारे, संगीताचा ठेका धरून श्रोत्यांना आनंदाची पर्वणी देणारे बासरी वादक अमर ओक, कॅसिओवादक-संगीत संयोजक कमलेश भडकमकर आणि तबलावादक आर्चिस लेले होम मिनिस्टरच्या मंचावर सपत्नीक खुलवणार आहेत मनोरंजनाच्या स्वरांनी सजलेला ‘तालबद्ध’ असा एक तासाचा विशेष भाग! ही वादक मंडळी आपापल्या संसाराचा ‘ताल’मेल कसा साधतात? ‘सौं’च्या तालावर आनंदाने कसे नाचतात? सुखी सहजीवनची ‘लय’ यांना कशी सापडली? त्यांचं एकमेकांशी कधी ‘वाजतं’ का? एकमेकांच्या कोणत्या सवयींविषयी ते ‘हरकत’ घेतात? एकमेकांना हवी असलेली स्पेस अर्थात ‘जागा’ घेऊ देतात का? अशा एक ना अनेक रंजक प्रश्नांची उत्तरं ‘संगीतमय’ होम मिनिस्टरच्या एका तासाच्या विशेष भागात २६ नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता उलगडणार आहेत.

TOP 10 NEWS : साक्षी-अनुष्कामधील कनेक्शनपासून जयवंत वाडकरांच्या ग्लॅमरस मुलीपर्यंत..

सारेगमपमधून गायक, परीक्षक, निवेदक नेहमीच रसिकांच्या स्मरणात राहतात, पण ही वादक मंडळी पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर आपल्या सहजीवनाचा ‘सांगीतिक’ प्रवास उलगडणार आहेत. अमर, आर्चिस, कमलेश हे तिघेही सारेगमपच्या अगदी पहिल्या पर्वापासून आपल्या निष्णात वादनाने घराघरात पोहचले आहेत. सारेगपमच्या मंचावर आजवर अनेक नव्या गायकांच्या सुरांना समर्थ ताल देण्यात या तिघांनीही आपल्या वादनकलेचा कस लावला. गायक गातात, परीक्षक समीक्षा करतात आणि नवे गायक उजेडात येतात. यामधील दुवा म्हणून या वादक सेलिब्रेटींची भूमिका मोठी आहे. खूप कमीवेळा या वादकांवर कॅमेऱ्याची नजर जाते. पण आता होम मिनिस्टरमुळे या वादकांना कॅमेऱ्यासमोर आणताना त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील गंमतीजमती, नाजूक क्षण, अविस्मरणीय आठवणी असे एकेक कप्पे उलगडण्याचा अनोखा प्रयोग झी मराठीने केला आहे.