बिग बजेट, मोठमोठ्या कलाकारांची गर्दी, भरभरून अॅक्शन सीन्स असूनही प्रभास व श्रद्धा कपूरचा ‘साहो’ बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटताना दिसतोय. पहिल्या आठवड्यात चांगली कमाई करणारा हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यात मात्र बॉक्स ऑफीसवर मार खातोय. कथा आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत कमकुवत ठरलेल्या ‘साहो’च्या कमाईत दुसऱ्या आठवड्यात ८० टक्क्यांची घट झाली आहे.

प्रदर्शनानंतर पहिल्या आठवड्याच्या अखेर या चित्रपटाने ११५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. पण दुसरा आठवडा सुरू होताच कमाईचा आलेख खालच्या दिशेने जाऊ लागला. दुसऱ्या शुक्रवारी ‘साहो’ने फक्त ३.५० कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्या आठवड्यात ७९ कोटी रुपयांचा गल्ला जमवणाऱ्या ‘साहो’ने दुसऱ्या आठवड्यात फक्त १४.२५ कोटी रुपयेच कमवू शकला.

‘साहो’च्या निमित्ताने कथेच्या बाबतीत प्रेक्षकांना गृहीत धरता येणार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. याआधी ‘ट्यूबलाइट’, ‘झिरो’, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ असे मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपट दर्जेदार कथेअभावी बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटले. ‘साहो’चा दिग्दर्शक सुजीतने प्रेक्षकांना चित्रपट पुन्हा एकदा पाहा अशी विनंती केली होती. मात्र चांगल्या कथेअभावी चित्रपटाचं बॉक्स ऑफीसवर टिकणं अवघड आहे हे प्रेक्षकांनी अप्रत्यक्षपणे दाखवून दिलं.