News Flash

Movie Review : असह्य ‘साहो’

दोन वर्षांनी अभिनेता प्रभास 'साहो' चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'साहो'

‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटानंतर दोन वर्षांनी अभिनेता प्रभास ‘साहो’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बाहुबली’च्या दोन्ही चित्रपटांनंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा फार वाढल्या होत्या. तब्बल ३५० कोटी रुपये खर्चून साकारलेला ‘साहो’ प्रभासचा आणखी एक ब्लॉकबस्टर ठरेल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात असं काहीच घडत नाही. किंबहुना जे काही घडतंय ते का घडतंय असा प्रश्न हा चित्रपट पाहताना पडतो.

प्रभास, श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, मुरली शर्मा ही कलाकारांची गर्दी या चित्रपटात आहे. पण या गर्दीत मुख्य कथाच हरवली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून निर्माते, दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी बरेच अॅक्शन सीन या चित्रपटात दाखवले आहेत. पण केवळ गाड्या एकमेकांवर आदळणं, आपटणं, गुंडांनी गोळीबार करणं, मारहाण करणं याशिवाय वेगळं काही पाहायला मिळत नाही. चित्रपटातील मोजून एक-दोन गाणी या सर्व गोंधळातून सावरण्यास काहीशी मदत करतात. पण गाणी संपून जेव्हा पुन्हा कथा सुरू होते तेव्हा प्रचंड निराशा होते.

चित्रपटातील प्रभास कोणा सुपरहिरोपेक्षा कमी नाही. कारण अगदी काही फुटांवरून गुंड त्याच्यावर गोळी झाडत असतात पण तरीही त्याला काहीच होत नाही. काही दृश्ये या चित्रपटांमध्ये का आहेत असाही प्रश्न वारंवार पडतो. इथे तर्क लावायचा प्रयत्न जरी केला तरी उत्तर सापडणार नाही. प्रभास त्याच्या स्टाइलसाठी सर्वाधिक ओळखला जातो. त्यामुळे चित्रपटात त्याच्या कपड्यांवर फार खर्च करण्यात आला आहे. श्रद्धाच्या भूमिकेबद्दल बोलायचे झाल्यास, इथेही तुम्हाला तर्क बाजूला ठेवावा लागेल. कारण तिची भूमिकासुद्धा पेचात पाडणारी आहे.

एकंदरीत, ३५० कोटी रुपये खर्चून केलेला चित्रपट प्रेक्षकाचं मनोरंजन करण्यात पूर्णपणे नापास ठरतो. मध्यांतरानंतरही कथा उगाचच खेचल्यासारखी सारखी वाटते. उंचच उंच इमारती, महागड्या गाड्या, न उमगणारे अॅक्शन सीन्स, तर्कशून्य कथा, आदळआपट असलेल्या ‘साहो’ला लोकसत्ता ऑनलाइनकडून दीड स्टार.

swati.vemul@indianexpress.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 5:17 pm

Web Title: saaho movie review prabhas shraddha kapoor ssv 92
Next Stories
1 क्रिकेटपटूबरोबर अफेर?; चर्चांवरुन संतापली सुनील शेट्टीची मुलगी, म्हणाली…
2 रानू मंडल यांच्याबद्दल भाजपाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
3 नाही! मी बिग बींची कॉपी केलेली नाही.. – संजय दत्त
Just Now!
X