भितीचं सावट हे कोणत्याही रुपात समोर येऊ शकतं. आपण प्रयत्न केला तरी हे सावट दूर करता येत नाही. अशीच कथा सावट या आगामी मराठी चित्रपटाची आहे. हा भयपट असून चित्रपटाचं पोस्टर पाहून प्रत्येकाची या चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

एका गावामध्ये एकाच वर्षात सात आत्महत्या होतात. विशेष म्हणजे या सगळ्या आत्महत्या श्रावण महिन्यामध्येच होतात आणि या प्रत्येक आत्महत्येचा एक साक्षीदार आहे. साक्षीदारांनी या आत्महत्येवेळी कोणालातरी पाहिलं आहे, मात्र ती व्यक्ती कोण याचा उलगडा झालेला नाही. अशा आशयाचा हा टीझर असून तो पाहून प्रत्येकाच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं आहे.

हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटाचा पहिला टिझर पाहून कोणाच्याही मनात प्रश्नांचे डोंगर उभे राहतील. टिझरमध्ये दर्शवलेल्या संदेशावरून नक्कीच ह्यात गूढ, थरारक आणि रंजक कथानकाचा अंदाज येतो.

‘मराठीत एक म्हण आहे, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तसंच काहीसं सावट चित्रपटाबाबत आहे. सत्य-असत्याच्या रेषेवरचे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांचे सावटचं ब-याचदा माणसाच्या मनावर असते. आणि मग तो उगीच घाबरून श्रध्दा-अंधश्रध्देच्या कचाट्यात सापडतो’, असं चित्रपट निर्माती हितेशा देशपांडे म्हणाल्या.

‘हा चित्रपट थरारनाट्य असून एका गावात काही समजुती आणि गैरसमजुतींचं सावट लोकांच्या मनावर असताना, चित्रपटात आत्महत्यांच सत्र चालू होतं. चित्रपट गुढकथेवर आहे. यातील प्रत्येक पात्र तुम्हांला खिळवून ठेवतील, असा मला विश्वास आहे’, असं दिग्दर्शक सौरभ सिन्हा म्हणाले.

निरक्ष फिल्मच्या सहयोगाने लेटरल वर्क्स प्रा.लि.प्रस्तुत, हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित, सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटात स्मिता तांबे , मिलिंद शिरोळे, श्वेतांबरी घुटे आणि संजीवनी जाधव मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.