चित्रपट : सचिन अ बिलियन ड्रीम्स

‘क्रिकेटचा देव’ हा त्याचा लौकिक आणि तरीही त्याचे आयुष्य हे खुल्या पुस्तकासारखे आहे. त्यामुळे ‘सचिन तेंडुकर’ नामक झंझावाताचे लहानपण, सोळाव्या वर्षी त्याचा क्रि केटच्या मैदानात झालेला प्रवेश, त्याचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर, त्याचे रंगत गेलेले खेळ, विक्रम, वादविवाद या घटना त्याच्या चाहत्यांना तोंडपाठ आहेत. आणि तरीही खुद्द सचिन तेंडुलकरच्या तोंडून त्याच्या आयुष्याचा पट ऐकत तो समोर रिळामागून रिळांमध्ये उलगडत जाणे ही किती मोठी आनंदाची पर्वणी असू शकते याची प्रचीती ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ पाहिल्यावर येते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या आयुष्यावर आधारित असल्याने तो चरित्रपट आहे, मात्र रूढार्थाने चित्रपट नाही. एक प्रकारे माहितीपट किंवा अनुबोधपटाच्या वळणाने जाणारी सचिन तेंडुलकरची ही रुपेरी पडद्यावरची पहिलीच इनिंग इतकी चांगली रंगली आहे की प्रेक्षक सुरुवातीपासून शेवटापर्यंत त्यात गुंतून पडतो. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच कानात शिरलेली ‘सचिन! सचिन!!’ ही गुंज पडद्यावरची कथा संपली तरी आपल्या कानात अलवार वाजत राहते.

सचिन तेंडुलकर हा प्रतिभावंत खेळाडू आहे, यात शंका नाही. मात्र अंगी नानाविध प्रतिभा असणारे, गुण असणारे असे किती तरी जण असतात. सतत परिश्रम, अभ्यासाने अंगी असलेली गुणवत्ता वाढवणारे फार कमी असतात. सचिन तेंडुलकरने मेहनतीने, जिद्दीने आपला खेळ वाढवला, मोठा केला आणि म्हणून तो आज दिग्गज खेळाडू आहे, असे विधान या चित्रपटात सचिनच्या यशाचे सार उलगडताना निवेदक हर्षां भोगले यांनी केले आहे. ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या जेम्स अर्सकिन दिग्दर्शित चरित्रपटात सचिननेही त्याच्या खेळामागचा त्याचा विचार, त्याचे ध्येय आणि त्याच्या परिपूर्ततेसाठी त्याने केलेले अविरत परिश्रम हेच सूत्र घेऊन ही पराक्रमाची दास्ताँ रंगवली आहे. कुठल्याही स्टारला सचिन म्हणून रुपेरी पडद्यावर न आणता सचिनच्याच तोंडून, उपलब्ध फुटेज आणि थोडेफार चित्रीकरण याचा योग्य तो मेळ साधत केलेला हा नाटय़पूर्ण चरित्रपट वेगळा ठरतो. कारण अशा प्रकारची मांडणी असलेला चित्रपट अनेकदा कं टाळवाणा होण्याची शक्यता असते. चरित्रपटाची सरधोपट मांडणी म्हणजे लहानपणापासून वेगवेगळ्या टप्प्यावरच्या त्या व्यक्तीच्या आयुष्यातील घटना क्रमाने मांडणे याच पद्धतीने सचिनची कथा पडद्यावर येत असली. तरी सचिनशी लोकांचे एक भावनिक नाते आहे ज्याचा पुरेपूर वापर करत खेळाडू म्हणून फक्त त्याचा खेळ नव्हे तर त्याच्या खेळाने बदलत गेलेली सामाजिक-आर्थिक समीकरणे, देशावर त्याचा झालेला परिणाम या गोष्टी पहिल्यांदाच आपल्यासमोर या चित्रपटातून आल्या आहेत.

सचिन तेंडुलकरचे त्याच्या आई-वडिलांशी विशेषत: वडील रमेश तेंडुलकर यांच्याशी असलेले भावनिक नाते आणि त्याचे लहानपण रंगवण्यासाठी काल्पनिक व्यक्तिरेखांचा आधार घेण्यात आला आहे. तो भाग वगळता सचिन, सचिनची बहीण सविता, भाऊ नितीन आणि अजित, आई-वडील, पत्नी अंजली, आचरेकर सर ही मंडळी त्या त्या काळातील फुटेजमध्ये त्यांच्या वास्तव रूपात दिसतात. त्यामुळे पडद्यावर दिसणारी कथा बेतलेली आणि काल्पनिक आहे ही गोष्टच मनात उरत नाही. सचिनने सांगावे आणि ते जसेच्या तसे चित्ररूपात तुमच्यासमोर उभे राहावे, ही किमया यात साधली गेली आहे. सचिनचे त्याचा भाऊ अजितशी असलेले नाते.. त्याच्याच शब्दांत सांगायचे तर मैदानावर मी खेळत असलो तरी कुठे तरी मानसिक पातळीवर तोही माझ्याबरोबर तो खेळ खेळत असायचा. इतके खेळाच्या बाबतीत या दोन भावांमध्ये एकरूपता होती, या गोष्टी सचिनच्या तोंडून ऐकताना त्याची माहिती असली तरी नवलाईच्या वाटतात. पत्नी अंजलीशी त्याची झालेली पहिली भेट, लग्न या गोष्टींबरोबरच मैदानात हरल्यानंतर इतक्या मोठय़ा खेळाडूचे घरातील वागणे कसे असायचे, स्वत:तच हरवून जाणे, स्वत:ला बंदिस्त करून घेणे आणि मग पुन्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेले प्रयत्न याचा तपशील अंजली तेंडुलकर यांच्याकडून ऐकायला मिळतो. सचिनची आई, त्याच्या काकू, भाऊ अजित यांच्याबरोबरच हर्षां भोगलेपासून त्याच्या संघ सहकाऱ्यापर्यंत अनेकांकडून त्या त्या घटनांचे किस्से ऐकायला मिळतात.

सोळाव्या वर्षी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान विरुद्ध खेळतानाची त्याची नेमकी मानसिकता, त्यानंतर खेळाबरोबर येत गेलेल्या प्रसिद्धीची गोष्ट सांगतानाच सचिनच्या खेळामुळे माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येपासून ते अगदी अलीकडच्या २०११ मध्ये झालेल्या दहशवतवादी घटनांपर्यंत वेळोवेळी समाजाला नकारात्मक मानसिकतेतून बाहेर काढण्याचं काम कसं सहजी झालं हेही दिग्दर्शक दाखवून देतो. सचिनची बॅट आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात तळपायला लागल्यानंतर क्रिकेट सामन्यांचे दूरदर्शनवरून होणाऱ्या प्रसारणाचा प्रवास ‘ईएसपीएन’पर्यंत कसा पोहोचला आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये पैसा कसा आला असे बारीकसारीक सामाजिक-आर्थिक बदलांचे तपशीलही त्यात मांडले आहेत. त्याच ओघात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अझरकडून कर्णधारपद काढून सचिनकडे आल्यानंतर ड्रेसिंग रुमपासून मैदानातील खेळावर झालेला परिणाम सचिनच्या तोंडून ऐकायला मिळतो. त्यानंतरच्या काळात त्याला काहीही न सांगता कर्णधारपद काढून घेतल्यानंतर झालेले दु:ख आणि पुन्हा कर्णधार झाल्यानंतरचे वाईट अनुभव, ग्रेग चॅपेल प्रशिक्षक असताना बिघडलेला खेळ, मॅच फिक्सिंग याही गोष्टी चित्रपटात येतात. मात्र इथे सचिनने केवळ आपली बाजू मांडण्याचा सावधपणा बाळगला आहे. त्यानंतर त्याचा खेळ आणि २०११चा वर्ल्ड कप यावरच चित्रपट केंद्रित झाल्याने महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांचे कर्णधार म्हणून येणे आणि जुन्यांपासून नव्या खेळाडूंपर्यंत बदलत गेलेले त्याचे विश्व अशा ड्रेसिंग रुममधील काही गोष्टींना फाटा देण्यात आला आहे. पण तरीही यात अनेक न पाहिलेले प्रसंग, घटना, त्याचा मित्रपरिवार, अर्जुनला किक्रेटचे धडे देतानाची मानसिकता याचि देही याचि डोळा प्रेक्षकांना पाहायला मिळतात. केवळ आणि केवळ सचिन तेंडुलकरने सत्तर एमएमचा तो पडदा व्यापून टाकला आहे. त्याच्या गोष्टी ऐकताना आपण भावुक होतो, त्याच्याबरोबर पुन्हा त्याच्या खेळात गुंततो, व्यक्ती म्हणून आपल्यासारखीच त्याची होणारी ससेहोलपट पाहताना आपणही शांत होतो. एक खेळाडू म्हणून नव्हे तर प्रत्येकाला सचिन त्याच्या घरातील सदस्य वाटत असेल तर त्याचा मला जास्त आनंद आहे, ही त्याच्या वडिलांनी व्यक्त केलेली इच्छा हेच सूत्र धरून सचिनने मांडलेला आपल्या आयुष्याचा पट अतिशय सुंदर, अविस्मरणीय अनुभव ठरला आहे.

’ दिग्दर्शक – जेम्स अर्सकिन