निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमात सचिन खेडेकर एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. मुले आणि वडील यांच्यातील नात्यात वाढत चाललेल्या दुराव्यावर भाष्य करण्यात आले आहे. जी व्यक्ती संवेदनशील नाही, तिच्यातील संवेदनांबद्दल बोलणे कठीण असते. बाप म्हणून आपली कर्तव्ये पार पाडत असताना आपण अजाणतेपणे आपल्याच नात्यांना दुखावतो. मग आयुष्याच्या एका वळणावर या सर्व गोष्टी जाणवायला लागतात, त्यावेळी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते.

कथा पडद्यामागचीः रंगभूमीवर तुम्ही दररोज नव्याने जगत असता: आस्ताद काळे

संसार, मुले, त्यांचे शिक्षण या सगळ्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर वाहताना अनेकदा वडील रुक्ष आणि कठोर होतात. या प्रवासात त्यांच्याकडूनही नकळत काही चुका होतात. त्या चुका सुधारण्याचा निश्चय भास्कर पंडीत अर्थात सचिन ठरवतात आणि आपल्या मित्रांसोबत एका मिशनला सुरूवात करतात. हे मिशन नक्की काय आहे हे २९ सप्टेंबरला कळेलच. एका वडिलांनी आयुष्यात केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न ‘बापजन्म’ सिनेमातून केला आहे.

सचिन खेडेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ‘आशू’ म्हणजे पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि आकाश खुराणा यांनी काम केले आहे. ‘बापजन्म’चे लेखन निपुण धर्माधिकारी यांने केले आहे. त्याने याआधी उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या सिनेमात काम केले असून तो व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांचेही दिग्दर्शन करतो. ‘अमर फोटो स्टुडीओ’ हे त्याचे नाटक रंगभूमीवर गाजत आहे. भारतीय डिजिटल पार्टीसाठी सादर केलेल्या ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अॅण्ड निपुण’ या वेब शोच्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला आहे.