सुपरस्टार एन.टी. रामाराव यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाविषयी सध्या बरंच कुतूहल पाहायला मिळत आहे. या चित्रपटात एनटीआर यांच्या पत्नीची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री विद्या बालनच्या नावाला पसंती दिल्याचं कळत आहे. त्यानंतर आता या चित्रपटात एक मराठमोळा चेहराही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती आहे. हा चेहरा म्हणजे अभिनेते सचिन खेडेकर.

याबाबत माहिती देत खेडेकर म्हणाले की, ‘ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. एनटीआर यांच्याविरोधात बंड पुकारून मुख्यमंत्रीपद पटकावलेले राजकीय नेते भास्करराव ही व्यक्तिरेखा मी साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी काही महत्त्वाचे संदर्भ आणि छायाचित्रे मला दिली गेली. त्यांचे निरीक्षण, अभ्यास आणि वाचन मी सध्या करत आहे.’

सचिन खेडेकर

या चित्रपटात ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबत्ती आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. त्याचबरोबर बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा जिसूसुद्धा या चित्रपटातून झळकणार आहे. ज्याच्या खांद्यावर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या एल.व्ही. प्रसाद यांची व्यक्तीरेखा साकारण्याची जबाबदारी असणार आहे. क्रिश जे. दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती एन. बाळकृष्ण, विष्णू इंदुरी आणि साई कोरापती करणार आहेत