‘नेटफ्लिक्स’ची पहिली ओरिजिनल सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ची जगभरात चर्चा झाली. वादग्रस्त कथानकासोबतच कलाकारांच्या दमदार अभिनयासाठी ही सीरिज ओळखली जाते. याच वेब सीरिजमुळे जतिन सरना ऊर्फ बंटी याचं एका रात्रीत नशीब बदललं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. जतिनने ‘सेक्रेड गेम्स’मध्ये बंटीची भूमिका साकारली आहे आणि आता दुसऱ्या सिझनमध्येही तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जतिन मूळचा दिल्लीचा राहणारा. त्याच्या कुटुंबीयांवर कर्जाचं ओझं होतं. एकत्र कुटुंबपद्धतीत राहणाऱ्या जतिनचं शालेय शिक्षण दिल्लीतच झालं. मात्र तो नववीत असताना नापास झाला होता. त्यामुळे दहावीवीची परीक्षा त्याने बाहेरून दिली. अकरावीत तो पुन्हा नापास झाला. बारावीत तो कसाबसा पास झाला.

घरातील पैशांच्या तंगीमुळे त्याला घरातून पळून जावंसं वाटत होतं. लहानपणापासूनच त्याला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं. शाळेच्या एका कार्यक्रमात तो अक्षय कुमारच्या ‘मोहरा’ चित्रपटातील एका गाण्याच्या ड्रेसअपमध्ये पोहोचला होता. पण त्यावेळी उपस्थितांनी त्याची खिल्ली उडवली होती. मात्र या गोष्टींमुळे न खचता जतिनने कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं.

आणखी वाचा : ‘सेक्रेड गेम्स २’ व ‘गली बॉय’चं कनेक्शन माहीत आहे का?

वडिलांकडून पाच हजार रुपये घेऊन जतिन २००४ मध्ये मुंबईत आला. अभिनयाचं शिक्षण न घेतल्याने आणि अनुभव नसल्याने त्याला अनेकदा नकार पचवावा लागला. अनेकांनी त्याला काम देण्यास स्पष्ट नकार दिला. मुंबईत ज्यांचा जतिनला आधार होता त्यांनीही त्याची साथ सोडली. यानंतर जतिनला कळलं की, अभिनयाचं शिक्षण घेतल्याशिवाय काम मिळणं कठीण आहे. अखेर त्याने पुन्हा दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा : ‘नेटफ्लिक्स’ म्हणजे काय ठाऊक नसतानाही जितेंद्रला मिळाली काटेकरची भूमिका

यानंतर त्याने पार्ट-टाइम काम करायलाही सुरुवात केली. वडिलांच्या छोटेखानी व्यवसायात त्याला फार काही रस नव्हतं. तो एनएसडीमध्ये अभिनयाच्या शिक्षणासाठी गेला पण तिथे त्याला प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर तो श्रीराम सेंटर पोहोचला व तिथे आपल्या अभिनय कौशल्याने त्याने सर्वांना प्रभावित केलं. तिथे मिळालेल्या प्रशिक्षणामुळे जतिनमधला आत्मविश्वास वाढला. बरीच वर्षे मुंबईत छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्यानंतर जतिनला ‘सेक्रेड गेम्स’मधल्या बंटीची भूमिका मिळाली. या सीरिजमधील बंटीच्या भूमिकेमुळे जतिन एका रात्रीत स्टार झाला.