वेब विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन महिन्यापूर्वीच या सीक्वलची घोषणा नेटफ्लिक्सच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात आली. या सीक्वलची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता नेटफ्लिक्सने या वेब सीरिजमध्ये कोणकोणते कलाकार असणार आहेत याचा एक व्हिडिओ नेटफ्लिक्स इंडियाच्या युट्यूब अकाऊटवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

सेक्रेड गेम्सच्या पहिल्या भागांमध्ये असलेल्या कथानक, तगडे कलाकार, अभिनय, संवाद आणि सिनेमॅटीक लिबर्टीच्या बळावर पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनावर ‘सेक्रेड गेम्स’ राज्य केलं. पहिल्या भागामधील सैफ अली खान (दिलबाग सिंग), नवाजुद्दीन सिद्दीकी (गणेश गायतोंडे), जतीन सारना (बंटी), पंकज त्रिपाठी (गणेश गायतोंडेचा तिसरा अध्यात्मिक गुरु) हे कलाकार पुढच्या भागातही दिसणार आहेत. मात्र यामध्ये नवीन कलाकारांचा समावेशही झाल्याचे या व्हिडिओमधून दिसत आहे. दुसऱ्या पर्वामध्ये अभिनेत्री कल्की कोचलीन, अभिनेता रणवीर शौरी हे दोन नवीन कलाकार दिसणार आहेत. कल्की आणि रणवीर कोणते पात्र साकारणार आहेत हे अद्याप गुलगस्त्यामध्ये आहे. मात्र पहिल्या पर्वामध्ये जितेंद्र जोशी (काटेकर), राधिका आपटे (अंजली माथुर), कुब्रा सेट (कूकू) या मुख्य कलाकारांची एक्झीट झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळेच या पर्वात कल्की आणि रणवीरच्या रुपात तितक्याच तगड्या कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> Sacred Games 2 : ‘इस बार तो भगवान खुदको भी नहीं बचा सकता!’

नोव्हेंबर महिन्यापासून ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनच्या चित्रीकरणाला अखेर मुंबईत सुरूवात झाली आहे. सेक्रेड गेम्समध्ये गणेश गायतोंडे, बंटी, दिलबाग सिंग, सरताज सिंग यांच्या भोवती गुंफलेली कथा आहे. सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागात काय होणार याची उत्कंठा चाहत्यामध्ये आहे. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर या वेब सिरीजचे कथानक आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीनं साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिका प्रेक्षकांनी उचलून धरली होती. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेचे यासारखे अनेक संवाद सोशल मीडियावर हिट ठरले. शिवीगाळ, खून मारामारी, अश्लिल संवाद आणि दृश्यानं भरलेली ही वेब सीरिज जितकी वादाच्या भोवऱ्यात सापडली तितकीच ती प्रसिद्धही झाली होती. त्यामुळे आता कल्की आणि रणवीरच्या आगमनाबरोबर सीरिजचे कथानक कोणते वळण घेते याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.