येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी चित्रपट विरुद्ध वेब सीरिज अशी टक्कर पाहायला मिळणार आहे. एकीकडे तीन बहुचर्चित चित्रपट तर दुसरीकडे बहुप्रतिक्षित वेब सीरिज यादिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’, प्रभासचा ‘साहो’ आणि जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हे तिन्ही चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहेत. तर प्रेक्षकांना गेल्या वर्षभरापासून ज्या वेब सीरिजची प्रतीक्षा होती, तो ‘सेक्रेड गेम्स २’ याच दिवशी प्रदर्शित होणार असल्याचं नुकतंच जाहीर झालं. त्यामुळे अक्षय कुमार, प्रभास आणि जॉन यांच्यासमोर गणेश गायतोंडेचं आव्हान असणार आहे.

सेक्रेड गेम्स २-

‘नेटफ्लिक्स’ या डिजीटल प्लॅटफॉर्मवरील ‘सेक्रेड गेम्स’ या गाजलेल्या वेब सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये प्रेक्षकांना पहिल्या सिझनमधील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत त्यामुळे या दुसऱ्या सिझनची फार उत्सुकता आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी यांच्यासोबतच कल्की कोचलीन आणि रणवीर शौरी या दोन नवीन भूमिकांची यात भर पडली आहे.

मिशन मंगल- 

आर. बाल्की आणि जगन शक्ती दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय मुख्य भूमिकेत झळकणार असून त्याच्यासोबत अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू आणि सोनाक्षी सिन्हा झळकणार आहेत. भारताची मंगळ मोहिमेची खरी कथा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बाटला हाऊस- 

२००८ साली दिल्लीतील ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर हा चित्रपट आधारलेला आहे. १९ सप्टेंबर २००८ रोजी सकाळी ११ वाजता दक्षिण दिल्लीतील जामिया नगरातील एल-१८ बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांचे विशेष दल आणि इंडियन मुजाहिदीनचे चार अतिरेकी यांच्यात ही चकमक झडली. दोन तासांच्या धुमश्चक्रीत आतिफ अमिन आणि महम्मद साजिद ठार झाले, तर विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा शहीद झाले. याच घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये जॉन पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारणार आहे.

साहो- 

प्रभासच्या आगामी ‘साहो’ चित्रपटाची त्याचे जगभरातील चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अॅक्शन थ्रिलर असलेला ‘साहो’ हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रभास, श्रद्धासोबतच नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, महेश मांजरेकर आणि मंदिरा बेदी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.