‘सेक्रेड गेम्स’च्या पहिल्या सिझनच्या एक वर्षानंतर आता या बहुप्रतिक्षित व बहुचर्चित वेब सीरिजचा दुसरा सिझन प्रदर्शित झाला आहे. जुन्या कलाकारांसह या सिझनमध्ये काही नवीन कलाकारांचीही भर पडली आहे. १४ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.

विक्रम चंदा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कादंबरीवर ही सीरिज आधारित आहे. अनुराग कश्यप व नीरज घायवान यांनी दुसऱ्या सिझनचं दिग्दर्शन केलं आहे. पहिल्या सिझनमध्ये गणेश गायतोंडेचा उदय आणि त्याच्या नजरेतून मुंबई पाहायला मिळाली. आता दुसरा सिझन गायतोंडेच्या अस्तावर आधारित आहे.

कथा-
पहिल्या सिझनच्या अखेरीस सरताज सिंग ज्या अंडरग्राऊंड बंकरजवळ पोहोचतो, तिथे मिळालेल्या सर्व पुराव्यांचा तपास तो या सिझनमध्ये करत असतो. तर दुसरीकडे गणेश गायतोंडे देशापासून फार दूर केन्या आणि दक्षिण आफ्रिकेत आहे. आता तो एक अंडरकव्हर एजंट बनला आहे. त्याचं लक्ष्यसुद्धा आता बदललं आहे.

याचदरम्यान सरताज त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला भेटण्याचा प्रयत्न करतो. अण्वस्त्र हल्ल्यानंतर सरताज शाहिद खानचा (रणवीर शौरी) शोध घेत असतो. शाहिद हा हिजबुद्दीन नावाची दशतवादी संघटना चालवत असतो.

या सिझनमधील नवीन चेहरे-
या सिझनमध्ये तीन नवीन चेहरे दिसणार आहेत. रणवीर शौरी दहशतवादाच्या भूमिकेत आहे तर कल्की कोचलीन गुरूजींची (पंकज त्रिपाठी) शिष्य बनली आहे. अमृता सुभाष गुप्तहेराची भूमिका साकारत आहे.

पहिल्या सिझनप्रमाणेच या सिझनचीही कथा प्रेक्षकाला गुंतवून ठेवते. एका फ्लॅशबॅक सीनमध्ये जेव्हा गायतोंडे गुरूजीजवळ येतो तेव्हा तिथे माल्कोम (ल्यूक केनी) दिसतो आणि तिथेच कथेला वळण येतं.