बहुप्रतिक्षित व बहुचर्चित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’च्या पहिल्या सिझननंतर एक वर्षानंतर आता या वेब सीरिजचा दुसरा सिझन प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांना या वेब सीरिजची प्रचंड उत्सुकता होती. जुन्या कलाकारांसह या सिझनमध्ये काही नवीन कलाकारांचीही भर पडली आहे. १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजता ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचीच जोरदार चर्चा होऊ लागली आहे. इतकेच नव्हे तर या सिझनवरील भन्नाट मीम्ससुद्धा व्हायरल होऊ लागले आहेत.

चाहत्यांनी वेळ वाया न घालवता ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सिझन १४ ऑगस्ट रोजी रात्री पाहिला. दुसरा सिझन प्रदर्शित होताच हा सिझन अनेकांच्या पसंतील उतरला तर काहींनी सेक्रेड गेम्सच्या दोन्ही सिझनची तुलना केली आहे. ‘सेक्रेड गेम्स’च्या दोन्ही सिझनची तुलना नेटकऱ्यांनी हॉलिवूड आणि बॉलिवूडशी केली आहे. दोन्ही सिझनची तुलना करतानाचे भन्नाट मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दुसऱ्या सिझनचे दिग्दर्शन अनुराग कश्यप व ‘मसान’ चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घायवान यांनी केले आहे. पहिला सिझन जिथे संपतो तिथूनच दुसऱ्या सिझनची कथा सुरू होते. या सिझनचीही कथा प्रेक्षकाला गुंतवून ठेवते. या सिझनमध्ये गणेश गायतोंडे परदेशात लपून बसला आहे आणि ड्यूटीवरून निलंबित केलेला सरताज सिंग त्याचा शोध घेत आहे. पहिल्या सिझनमध्ये अवघ्या पाच सेकंदांसाठी आलेली जोजो मॅक्सरहन्स या सिझनमध्ये गायतोंडेच्या जीवनातील महत्त्वाची भूमिका साकारत आहे.