एका न्यायाधीशाची कारण न देता सुनावणीतून माघार

नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या मालिकेतील काही दृश्यांत माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह आशय आहे, त्यामुळे ते काढून टाकावेत अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याचिकेत असा आरोप केला आहे,की यातील काही दृश्ये व संवाद आक्षेपार्ह असून त्यात दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी यांची बदनामी झाली आहे. हंगामी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल व न्या. सी.हरी शंकर यांनी ही याचिका दाखल करून घेतली आहे. दुपारी त्यावर सुनावणी सुरू झाली असता एका न्यायाधीशांनी कारण न सांगता सुनावणीतून माघार घेतली असून आता त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये उत्तर कोलकात्यातील  गिरीश पार्क पोलिस स्टेशनला या मालिकेबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकर्ते राजीव सिन्हा यांनी तक्रारीत म्हटले आहे, की दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची  ‘सेक्रेड गेम्स’ मालिकेत बदनामी करण्यात आली आहे.

या सगळ्या प्रकारास अभिनेते नसीरूद्दीन सिद्दीकी, नेटफ्लिक्स व सेक्रेड गेम्सचे निर्माते जबाबदार आहेत.  पोलिसांनी सांगितले, की आम्ही या प्रकरणी आरोपांची चौकशी करीत आहोत. सिन्हा यांनी या तक्रारीच्या प्रती पोलिस आयुक्त, सहपोलिस आयुक्त , पोलिस उपायुक्त यांना सादर केल्या आहेत. ‘सेक्रेड गेम्स’ मालिकेत सैफ अली खान, नवाझउद्दीन सिद्दीकी व राधिका आपटे यांच्या भूमिका आहेत. यात  मुंबईतील एका दहशतवादी हल्ल्याचा कट उधळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची कथा आहे.