सेक्रेड गेम्स या वेब सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांना भावला नाही. या सिझनकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या मात्र त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत अशी कबुली आता अभिनेता सैफ अली खान याने दिली आहे. सध्या सैफ अली खान लाल कप्तान या त्याच्या आगामी सिनेमच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. मात्र त्याने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सैफने सेक्रेड गेम्सचा सिझन टू लोकांना म्हणावा तेवढा भावला नाही असं सैफने अखेर मान्य केलं आहे.

“सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझनची भट्टी उत्तम जमली होती. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझनला मिळालेलं यश अभूतपूर्व होतं. दुसरा सिझन मात्र तेवढा यशस्वी झाला नाही. सेक्रेड गेम्स हे नाव या सीरिजला का देण्यात आलं? हा प्रश्न मला पडला होता. मात्र मला ही बाब जाणवली की यामध्ये गुरुजी हे पात्र खूप महत्त्वाचे आहे. मात्र प्रेक्षक सिझन टू पाहताना गुरुजी या पात्राशी स्वतःला कनेक्ट करु शकले नाहीत. त्यामुळे हा सिझन पहिल्या सिझनएवढा यशस्वी झाला नाही” असं सैफने म्हटलं आहे.

सेक्रेड गेम्सचा सिझन वन चांगलाच गाजला होता. यामधली गणेश गायतोंडे, सरताज, काटेकर, कांताबाई, बंटी, ईसा, परुळकर, भोसले ही पात्रं सगळ्यांनाच चांगलीच भावली होती. मात्र दुसऱ्या सिझनमध्ये पहिल्या एवढी मजा आली नाही हे आता सैफ अली खाननेच मान्य केलं आहे. सैफ अली खानने या सीरिजमध्ये सरताज सिंग हे पात्र साकारलं आहे.