News Flash

भरकटलेली ‘सडक’

कथाविषय, त्याची मांडणी, गाणी-संगीत सगळ्याच बाबतीत १९९१ साली प्रदर्शित झालेला ‘सडक’ उजवा होता

भरकटलेली ‘सडक’

रेश्मा राईकवार

कथा भरकटली की चित्रपटाची कशी चिरफाड होते याचं उत्तम उदाहरण म्हणून ‘सडक २’कडे पाहता येईल. २९ वर्षांपूर्वी जो चित्रपट तद्दन व्यावसायिक असूनही दखल घेण्याइतका वेगळा ठरला होता, त्याचा दुसरा भाग करताना दिग्दर्शक म्हणून महेश भट्ट इतका सुमार चित्रपट देतील, अशी कल्पना करणंही कठीण होतं. मात्र कथा-दिग्दर्शनाच्या बाबतीत सुमार ठरलेल्या या चित्रपटाला सध्या उत्तम अभिनेत्री म्हणून गणल्या जाणाऱ्या आलिया भट्टलाही सावरता आलेलं नाही. तिच्या आजवरच्या कारकीर्दीतील हा अगदीच टुकार चित्रपट आहे असं खेदाने म्हणावं लागेल.

कथाविषय, त्याची मांडणी, गाणी-संगीत सगळ्याच बाबतीत १९९१ साली प्रदर्शित झालेला ‘सडक’ उजवा होता. त्याचंच नाव घेऊन नव्याने आलेल्या या चित्रपटात जुन्या चित्रपटाचा कु ठलाच धागा नाही. अपवाद फक्त रवी किशोर वर्माचा (संजय दत्त). ‘सडक’ चित्रपटातील मुख्य प्रेमी जोडी रवी (संजय) आणि पूजा (पूजा भट्ट) यांची प्रेमकथा रवीच्या भूतकाळातील आठवणींच्या रूपात मधून मधून झळकत राहते. या कथेतील पूजाचं अपघाती निधन झालं आहे आणि मागे एकटय़ा उरलेल्या रवीला तिच्याशिवाय घर खायला उठतं आहे. जगण्याचा कोणताही उद्देश नसलेल्या रवीला आपलं आयुष्य संपवून पूजाकडे जायचं आहे. मात्र त्याचे जिवलग त्याला तसे करू देत नाहीत. जगावं की मरावं या त्याच्या संघर्षांत एके  रात्री त्याच्या घराचा दरवाजा ठोठावत आलेल्या आर्याच्या (आलिया) रूपाने जगण्याचा उद्देश सापडतो. अंधश्रद्धा आणि भोंदू बाबांविरुद्ध लढणाऱ्या आर्याच्या जिवाला धोका आहे. या सगळ्यापासून दूर कै लास पर्वताच्या दिशेने निघालेली आर्या आणि तिचा प्रेमी विशाल (आदित्य रॉय कपूर) या दोघांना सुरक्षित तिथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी रवीवर आहे. या प्रवासात आर्याच्या भूतकाळाशी त्याची ओळख होते आणि तिचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी रवी जिवाची बाजी लावतो, अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा म्हणता येईल.

नाही म्हणायला २०२० मध्ये घडणाऱ्या या कथेला अंधश्रद्धा आणि भोंदू बाबांविरुद्धच्या लढय़ाची झालर आहे खरी.. आणि गेल्या काही वर्षांत उघडकीस आलेली प्रसिद्ध भोंदू बाबांची प्रकरणं पाहता महेश भट्ट शैलीतील या चित्रपटात त्याचा समाचार घेतला जाईल, अशी आपली अपेक्षा सुरुवातीच्या काही फ्रे म्समध्येच गळून पडते. ज्या पद्धतीने ग्यानप्रकाश नामक भोंदू बाबा आणि त्याच्याबरोबरीने या अंधश्रद्धा वाढवण्याच्या प्रकारात अडकलेले आर्याचे कु टुंबीय दाखवण्यात आले आहेत ते अनेकदा अतिरंजक आणि अवास्तव वाटत राहतं. त्यामुळे विषय नको, कथेचा फु का गोंधळ आवरा, अशी आपली अवस्था होते. ती आर्या आणि विशाल यांच्या प्रेमाची गोष्ट म्हणावी तर तिथंही दिग्दर्शकाने विशालच्या भूतकाळाचं पाचर मारून ठेवलं आहे. राहता राहिलं रवीला आर्याविषयी वाटणारं ममत्व आणि पित्याच्या भूमिके तून त्याने के लेलं तिचं रक्षण हा एकच धागा चित्रपटात उरतो. आणि तो अभिनेता संजय दत्तमुळे सुसह्य़ झाला आहे. खुद्द आलियालाही एक कणखर नायिका म्हणून उभी करण्याचा सुरुवातीचा प्रयत्न सोडता दिग्दर्शकाने तिलाही या चित्रपटात ना धड प्रेम करू दिलं आहे, ना अन्यायाविरुद्ध लढा. हीच गत आदित्य रॉय कपूरपासून खलनायकी भूमिके त समोर आलेल्या जिशू सेनगुप्तापासून मकरंद देशपांडे, गुलशन ग्रोव्हर या सगळ्यांच्या बाबतीत झाली आहे. ‘सडक’मधील रवीच जर याही कथेचा नायक आहे तर निदान त्याच्या जुन्या चित्रपटातील प्रसंगांना मुकं  न ठेवता त्याला बोलकं  करत, त्याच चित्रपटातील गाजलेल्या गाण्यांचा वापर करून घेतला असता तरी काही प्रभाव पाडता आला असता. मात्र कशाचा कशाशी ताळमेळ नसलेली ही ‘सडक’ आपल्यालाच भरकटत नेते. दिग्दर्शक म्हणून महेश भट्ट यांनी काही काळ संन्यास घेतला होता. त्यानंतर आलेला हा ‘सडक २’ भट्ट यांच्या शैलीच्या, त्यांच्या ताकदीच्या जवळपासही जाणारा नाही. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून त्यांना त्यांचा योग्य रस्ता सापडेपर्यंत प्रेक्षकांना आणि त्यांच्या कन्येलाही अंमळ वाट पाहावी लागणार असं दिसतं.

सडक २

दिग्दर्शक – महेश भट्ट

कलाकार – आलिया भट्ट, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर, जिशू सेनगुप्ता, मकरंद देशपांडे, प्रियांका बोस, गुलशन ग्रोव्हर, अक्षय आनंद.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 3:18 am

Web Title: sadak 2 movie review by reshma raikwar zws 70
Next Stories
1 ‘दिलबर’ गाण्याच्या अरेबिक व्हर्जनवर नोराचा डान्स, व्हिडीओ व्हायरल
2 “हर हर महादेव”; रियाच्या भावाला अटक होताच अंकिताने व्यक्त केलं समाधान
3 मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? भाजपा नेत्याचा सवाल
Just Now!
X