हिंदी सिनेसृष्टीतील ‘हवा-हवाई’ अर्थात श्रीदेवी. श्रीदेवीचा दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पहाटे ३ च्या सुमारास ही बातमी समोर आली. यानंतर सोशल मीडियावरही ही बातमी पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे म्हणत ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे. श्रीदेवी ही आपल्या अभिनयाला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री होती. तिने तिच्या कारकिर्दीत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. तिने साकारलेल्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत. मी श्रीदेवीच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. तिच्या आत्म्याला शांती मिळो.. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांसोबतच इतरही अनेक राजकीय नेत्यांनी श्रीदेवीच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकताच धक्का बसला असे ट्विट प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. तसेच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनीही शोक व्यक्त केला आहे. एक अभिनेत्री म्हणून तिचा कायम अभिमान होता. ती गेल्याचे समजल्याने धक्का बसला आमच्या मनातले तिचे स्थान अढळ राहिल असे नायडू यांनी म्हटले आहे.