कर्नाटक येथील घटनेनंतर हिंदी फाइट मास्टर्सची अपेक्षा

सध्या हिंदी चित्रपटांमध्येच नव्हे तर प्रादेशिक चित्रपटांमध्येही हिरो स्वत:चे स्टंट्स स्वत: करतात आणि मग हे स्टंट सुरू असताना एखाद्याला मार लागला, काही अपघात झाला तर त्याची मोठी चर्चाही होते. या हिरोंबरोबर सातत्याने काम करणाऱ्या स्टंट्समन, फाइट मास्टर्स यांची फौज मात्र तेवढी नशीबवान नसते. त्यांच्यासाठी हे छोटेमोठे अपघात नित्याचे आहेत. त्याची चर्चा सोडाच पण त्याची वार्ताही सेटपलीकडे फारशी पोहोचत नाही. कर्नाटकमध्ये तलावात चित्रीकरण सुरू असताना अनिल कुमार आणि राघव उदय यांना हकनाक जीव गमवावा लागल्यानंतर स्टंट्समनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पाश्र्वभूमीवर चित्रीकरणाच्या वेळी आम्ही सांगितल्यानुसार सुरक्षेच्या उपाययोजना सेटवर नसतील तर आम्ही कामच करत नाही. आमच्यासाठी सुरक्षेचा विचार महत्त्वाचा आहे, असा दावा हिंदीतील प्रसिद्ध फाइट मास्टर्सनी केला आहे.

गेली ३५ वर्षे फाइट मास्टर म्हणून काम करणाऱ्या यज्ञेश शेट्टी यांनी कोणताही स्टंट सेटवर करत असताना त्या स्टंटदरम्यान संभाव्य दुर्घटना काय घडू शकतात याचा विचार करून त्यादृष्टीने आधीच उपाययोजना करणे ही फाइट मास्टरची पहिली जबाबदारी असते, असे सांगितले.

स्टंटदृश्यांची जबाबदारी पूर्णत: फाइट मास्टरवर असल्याने स्टंट करत असताना कुठलीही दुर्घटना घडली तर फाइट मास्टरवर गुन्हा दाखल होतो. त्यामुळे स्टंटदृश्ये देण्याआधीही सुरक्षा योजना आहेत की नाहीत हे फाइट मास्टर तपासून पाहतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

व्हीएफएक्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर व्हावा

सध्या व्हीएफएक्ससारखे तंत्रज्ञान हाताशी असताना १९६० सालच्या तंत्राचा वापर करत स्टंटमनचा जीव धोक्यात का घालता? असा प्रश्न खुद्द फाइट मास्टर्सकडूनच उपस्थित केला जातो आहे. कित्येकदा काहीतरी मोठे करून दाखवण्याच्या नादात फाइट मास्टर्स अशा चुका करून बसतात. जी साहसी दृश्ये ग्रीन पडद्यावर चित्रित करून व्हीएफएक्सच्या मदतीने रंगवणे शक्य आहे तिथे अशाप्रकारे स्टंटमनला काम करायला लावण्यात अर्थ नाही, असे शेट्टी यांनी सांगितले. फाइट मास्टर अंदालीब पठाण यांनीही जर निर्मात्यांनी सुरक्षेसाठी मागितलेली साधने देण्यास टाळाटाळ केली तर आपण कामच करत नसल्याचे सांगितले.

स्टंटमनच्या मानधनात वाढ करण्याची मागणी

अ‍ॅक्शनपटांची जाण असणारे, रुची असणारे दिग्दर्शक हिंदीत असल्याने फाइट मास्टर्सना सेटवर फारशा अडचणी येत नाहीत. स्टंटमन, बॉडी डबल्स यांच्याशी निर्माता कुठलाही करार करत नाही. फाइट मास्टर असोसिएशनने जे दर ठरवून दिले आहेत त्यानुसार त्यांना दैनंदिन तत्त्वावर रोजगार मिळतो. साध्या साध्या स्टंट्साठी त्यांना प्रत्येक शिफ्टनुसार सहा ते सात हजार रुपये एवढे मानधन मिळते. गाडय़ांवर उभे राहून करायचे स्टंट असतील किंवा खास वेगळ्या स्टंट्समध्ये माहीर असणारे स्टंटमन त्यांच्या कलेसाठी त्यांना योग्य वाटेल ते मानधन मागतात आणि निर्मात्यांना ते द्यावे लागते. मात्र स्टंटमन कुठलाही असो त्यांना चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली तर निर्माते त्यांना आर्थिक मदत करतात. स्टंटमनना सध्या मिळणारे मानधन चांगले असले तरी त्यांना यापेक्षा जास्त मानधन देणे निर्मात्यांना सहज शक्य आहे, असे पठाण यांनी सांगितले.

कर्नाटकमधील घटना टाळता येण्यासारखी

कर्नाटकमध्ये ‘मस्तीगुडी’च्या सेटवर हेलिकॉप्टरमधून दोन्ही स्टंटमनना पाण्यात उडी टाकायची होती. त्या दोघांनाही पोहता येत नाही, याची कल्पना फाइट मास्टरला होती. त्यामुळे त्यांना पाण्यात उडय़ा टाकल्यावर लाईफ जॅकेट देण्याची सुविधा असायला हवी होती. कमीतकमी उडय़ा मारताना केबलचाही वापर करता आला असता. मात्र यापैकी कु ठलीच उपाय योजना न करता त्या दोघांनाही हा स्टंट करावा लागला. अशाप्रकारच्या स्टंट्समध्ये समुद्रात पोहायची सवय असणाऱ्या कुशल स्टंट्समनची गरज होती. हेलिकॉप्टर इतक्या जवळ असताना त्याच्या पंखांमुळे पाण्यावर जो हवेचा दाब निर्माण होतो तो सहन करण्यापलीकडचा असतो. कुठल्याही स्टंट्समनला अशा बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो, असे शेट्टी यांनी सांगितले.