News Flash

‘हे तर माझ्यातील अभिनेत्याला आव्हान’

सागरशी केलेली बातचीत..

‘भाई-व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटात ‘पुलं’ची भूमिका साकारलेला सागर देशमुख आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका महामानवाची गौरवगाथा’ ही मालिका सुरू होणार असून या मालिकेच्या निमित्ताने सागर देशमुख पहिल्यांदाच छोटय़ा पडद्यावर पहिल्यांदा दिसणार आहे. त्यानिमित्त सागरशी केलेली बातचीत..

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेविषयी बोलताना सागर म्हणाला, ‘दशमी क्रिएशन’ या निर्मिती संस्थेतून निनाद वैद्य यांचा फोन आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित मालिका आम्ही करतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावर मालिका येत आहे आणि त्यात मला मुख्य भूमिका साकारायला मिळणार, म्हटल्यावर आनंदाने उडीच मारली. पुन्हा चरित्रात्मक भूमिका करायला मिळणार म्हणून आनंदाने होकार दिला पण खरी परीक्षा पुढे सुरू झाली. आता प्रत्यक्षात ती भूमिका साकार करण्यासाठी मेहनत घ्यायची होती.

भूमिकेची तयारी कशी केली? या प्रश्नावर त्याने सांगितले, ‘ज्ञानसूर्य’, ‘महामानव’ अशी विशेषणे बाबासाहेबांना लावली जातात. त्यांचे काम प्रचंड मोठे आहे. त्यांच्या कामाचा आवाका आपल्याला किमान समजून तरी घेता येणं शक्य आहे का? या विचाराने तयारीला सुरुवात केली. आवश्यक ती माहिती, संदर्भ गोळा करून वाचायला लागलो. Annihilation of Caste नावाचं जातीव्यवस्थेचं उच्चाटन यावर बाबासाहेबांनीच लिहिलेलं पुस्तक, धनंजय कीर यांनी लिहिलेलं बाबासाहेबांचं चरित्र वाचले. प्रा. सुखदेव थोरात यांनी बाबासाहेबांवर दिलेली व्याख्याने यूटय़ूबवर पाहिली. बाबासाहेबांच्या कार्याचा देशावर तसेच राजकीय, सांस्कृतिकदृष्टय़ाष्टय़ा झालेला परिणाम, आरक्षण म्हणजे काय? डॉ. आंबेडकर यांनी घटना लिहिली म्हणजे काय केलं? हे सगळं समजून घेत गेलो. २००३ मध्ये मी वकिलीची परीक्षा पास झालो. मी ‘आयएनएस’ विधि महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. भारतीय संविधानाचा तेव्हा केलेला अभ्यास हा केवळ परीक्षेमध्ये गुण मिळवण्यापुरताच होता. परंतु आता डॉ.आंबेडकरांची भूमिका साकारताना आपल्याला बाबासाहेबांची भूमिका साकारायची आहे, अशा पद्धतीने केला. माझा भूमिकेचा प्रवास हा वैयक्तिक असतो. चरित्र भूमिका साकारताना त्या व्यक्तीविषयीच्या साहित्याचं वाचन करणं, त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेणं, हे मला स्वत:ला कुठेतरी माणूस म्हणून श्रीमंत करतं. माझ्यातील अभिनेत्याच्या वाढीसाठीही ते फायदेशीर ठरतं.

गेली काही वर्षमी चित्रपट माध्यमाशी जोडलो गेलो होतो. ‘वायझेड’ हा माझा पहिला मराठी चित्रपट होता. छोटय़ा पडद्यासाठी वेळ काढणं तसं अवघड काम. पण अशा आव्हानात्मक भूमिकेसाठी आपण होकार देतो, तेव्हा त्यासाठी वेगळा वेळही राखून ठेवला जातो. ही दैनंदिन मालिका असल्यामुळे निश्चितच छोटय़ा पडद्यासाठी आता जास्त वेळ देणार आहे. मात्र असं असलं तरी प्रायोगिक नाटकात काम करणं एका बाजूला सुरूच राहील. ‘चहेता’ नावाचं हिंदी नाटक मोहित टाकळकरांनी दिग्दर्शित केलं असून त्यात काम करतोय. ‘आसक्त कलामंच’ या माझ्याच संस्थेचं ते नाटक आहे. या संस्थेच्या माध्यमातून आमची प्रायोगिक नाटकं देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही करतो. पण मी व्यावसायिक नाटकात काम करत असतो तर त्याच वेळी मालिकेत काम करणं शक्य झालं नसतं. व्यावसायिक नाटक करताना एक वेळ चित्रपट करणं जमू शकतं, पण मालिका करता येत नाही. मोहित टाकळकरांकडेच एक चित्रपटही मी करतोय, तो पूर्ण झाला की माझं पूर्ण लक्ष मालिकेकडेच असणार असल्याचं सागरने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वकिलीचे शिक्षण घेऊन नाटकाकडे कसा वळला, याविषयी तो म्हणाला, भालबा केळकर, डॉ. श्रीराम लागू आदी मान्यवरांनी स्थापन केलेल्या ‘प्रोग्रेसिव्ह डायनामिक असोसिएशन’ या नाटय़ संस्थेत मी २२ दिवसांची नाटय़ कार्यशाळा केली होती. तिथेच नाटकाची गोडी लागली. त्यानंतर सातत्याने प्रायोगिक नाटकं करत राहिलो. माझे वडील वकील होते, त्यामुळे त्यांची इच्छा म्हणून मी वकील झालो. पण माझा ओढा नेहमीच नाटकांकडे होता. वकिलीची परीक्षा पास झाल्यावर मुंबईत येऊ न चार व्यावसायिक नाटकांमध्येही काम केलं. पण व्यावसायिक नाटकातलं काम मला तितकंसं मानवलं नाही. त्यामुळं पुन्हा पुण्यात येऊ न वकिली सुरू केली. ६ ते ७ वर्षमी न्यायालयात जाऊ न वकिलीचा सराव (प्रॅक्टिस) केला. त्यानंतर ते सोडून लिखाण आणि अभिनयाकडे वळलो. हिंदी, मराठी आणि इंग्रजी प्रायोगिक नाटके केली. पुढे जाहिराती आणि चित्रपट असा प्रवास झाला. माझं ‘पिया बहरुपिया’ नावाचं हिंदी नाटक मी करायला घेतलं. त्याचा पहिला प्रयोग लंडनच्या शेक्सपिअर्स ग्लोब थिएटरमध्ये झाला. शेक्सपिअर यांनी स्वत: ज्या ठिकाणी काम केलं अशी ती वास्तू आहे. तिथे प्रयोग झाला त्याक्षणी वाटलं की अभिनयामुळेच आपण इथं येऊ  शकलो. पूर्वजन्माची पुण्याई म्हणून हा अनुभव घेता आला. हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता.  ‘स्टार प्रवाह’ वाहिनी, निर्मिती संस्था कलाकार, लेखक आणि तंत्रज्ञ मिळून एकत्रितपणे मेहनत घेत आहेत. त्यामुळे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर एका महामानवाची गौरवगाथा’ ही चांगली कलाकृती घडेल. दूरचित्रवाणी माध्यमामध्ये घराघरात पोहोचण्याची ताकद आहे. या माध्यमाचा चांगला वापर करून जर मालिका सादर केल्या तर खूप चांगले विषय लोकांपर्यंत पोहोचतील. हे माध्यम अजून चांगल्या प्रकारे धुंडाळण्याची आवश्यकता असल्याचे सागर म्हणाला.

अभिनयक्षेत्रातील वाट अनवट असून मालिका आणि चित्रपटच करायचे असते तर ते केव्हाच केले असते. चित्रपट किंवा मालिकांकडे जाणारा मार्ग म्हणून कधीही नाटकाकडे पाहिलं नाही. तिन्ही माध्यमांमध्ये नाटकच जवळचं वाटतं. अजूनही कॅमेऱ्यासमोर काम करायला सरावलो नाहीये. तरीही हे माध्यम धुंडाळण्यासाठी आणि माझ्यातील अभिनेत्याला आव्हान म्हणून ‘स्टार प्रवाह’वरील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर एका महामानवाची गौरवगाथा’ ही मालिका स्वीकारली.    – सागर देशमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2019 12:08 am

Web Title: sagar deshmukh babasaheb ambedkar
Next Stories
1 मनोरंजनाची संहिता
2 दर्जा!
3 ‘प्रभावी दृश्यरूप मांडणीतच रहस्य’
Just Now!
X