दिलीप ठाकूर

हिंदी चित्रपटाच्या इतिहासात अभिनयाचा जबरदस्त मुकाबला झालेले चित्रपट अनेक. पण त्यात दोन वा तीन कलाकार तोडीस तोड ठरल्याची उदाहरणे मोजकी दोनच. एक म्हणजे, मेहबूब खान दिग्दर्शित ‘अंदाज’ (१९४९)मधील  राज कपूर, नर्गिस आणि दिलीपकुमार यांचा अभिनय सामना आणि त्यानंतर जी. पी. सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सागर’ (१९८५)मधील ऋषि कपूर, डिंपल खन्ना आणि कमल हसन यांचा जबरा अभिनय मुकाबला. तिघेही आपापल्या जागी कमालीचे सरस. आणि म्हणूनच ‘सागर’ पुन्हा पुन्हा पहावा, अनुभवावा.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

‘सागर’ची वैशिष्ट्ये अनेक

‘बॉबी’ (१९७३)नंतर डिंपलने तब्बल बारा वर्षांनंतर चित्रपटात पुनरागमन केलेला चित्रपट म्हणजे, ‘सागर’. राजेश खन्नासोबतच्या संसारातून आपल्या दोन मुलींसह (ट्विंकल आणि रिंकी) बाहेर पडल्यावर डिंपलने हा चित्रपट स्वीकारला (मग इतरही चित्रपट तिला मिळत गेले) पण एव्हाना रसिकांची एक पिढी पुढे गेली होती आणि डिंपल जुना चार्म दाखवेल का हाच प्रश्न होता. सगळ्यालाच सकारात्मक उत्तर मिळाले.

‘सागर’ संगीतमय प्रेम त्रिकोण.

जावेद अख्तरची ही पटकथा. कमल हसन व डिंपल समुद्रकिनाऱ्यावरील वस्तीत लहानपणापासूनचे छान मित्र. मोठे होतानाच कमल हसन डिंपलच्या प्रेमात पडतो. तर याच गावातील प्रशस्त बंगल्यातील ऋषि कपूर विदेशात मोठा होऊन आता येथेच राह्यला येतो तेव्हा एका पहाटे समुद्र स्नान करणार्‍या डिंपलला पाहून स्तिमित होतो. तिच्या प्रेमात पडतो. या दोघांची ओळख होते आणि यांच्यात प्रेमाचे नाते निर्माण होत जाते. दरम्यान कमल हसन व ऋषि कपूर हेदेखील जीवलग दोस्त बनतात. पण आपला मित्र ऋषि आपल्याच मैत्रीणीचा प्रियकर आहे हे पचवणे कमल हसनला कमालीचे जड जाते. हा पेच म्हणजेच हा चित्रपट होय. अतिशय तरलपणे हा चित्रपट घडतो, आकार घेतो. आणि त्यात या तिघांचाही तोडीस तोड अभिनय आणि गीत-संगीत यांचा खूपच महत्त्वपूर्ण वाटा आहे. संगीतकार राहुल देव बर्मनच्या सर्वोत्तम चित्रपटातील हा एक आहे. ‘चेहरा हैं या चाँद खिला है’, ‘ सागर किनारे दिल यह पुकारे’, ‘ ओ मारिया, जाने दो ना पास आ ओ ना’ (याच गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळचे हे सोबतचे छायाचित्र), ‘बस मेरे यार है…’ सगळीच गाणी आजही ताजीच वाटतात. चित्रपटात इतरही लहान मोठ्या व्यक्तिरेखा खूप. पण आपले सगळेच लक्ष याच तिघांवर खिळते.

या चित्रपटासाठी मढ येथील अक्सा बीचवर कोळी वस्तीचा दीर्घकालीन सेट लागला होता. आणि रमेश सिप्पी प्रत्येक दृश्यासाठी आग्रही. इतका की, ‘चेहरा है या…’ गाण्यातील अगदी सावली देखील पडद्यावर सलग दिसावे म्हणून रमेश सिप्पी अनेक दिवस नेमक्या त्याच वेळेस शूटिंग करे आणि ऋषि आणि डिंपल यांनीही यासाठी आवर्जून सहकार्य केले. त्या दिवसात ही गोष्ट खूप कौतुकास्पद होती.

अभिनयाचे बारकावे शिकू इच्छिणाऱ्यांनी ‘सागर’ नक्कीच पहावा.