चीनमधील वुहान शहरातून फैलाव झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगभरात हातपाय पसरले आहेत. अनेक देशांमध्ये या विषाणूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे प्रत्येक देश आपल्या नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्याची काळजी घेण्याची विनंती करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सरकार नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहे. यामध्येच काही अफवादेखील पसरत आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील एका अभिनेत्यानेदेखील अशीच एक अफवा पसरवली, ज्यामुळे त्याला जाहीरपणे माफी मागावी लागली आहे.
‘स्टाइल’ या चित्रपटात झळकलेला अभिनेता साहिल खान साऱ्यांनाच ठावूक असले. तर याच साहिल खानने त्याच्या इमारतीत राहत असलेल्या दोन जणांना करोनाची लागण झाल्याची अफवा सर्वत्र पसरवली. मात्र सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत संबंधित व्यक्तींची माफी मागितली आहे.
‘फिल्मीबाईट’नुसार, काही दिवसापूर्वी साहिलने त्याच्या इमारतीत राहणाऱ्या दोन व्यक्तींची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं होतं. ‘गोरेगावमधील आमच्या इंपीरियल हाइट्स येथे दोन व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. यात एका व्यक्तीचं वय ७२ वर्ष आहे. तर दुसऱ्याचं वय १८ आहे’, असं साहिलने सांगितलं होतं. मात्र त्याविषयी त्याच्याकडे कोणतेच ठोस पुरावे नव्हते. त्याच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण भागात भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र सत्य परिस्थिती समोर आल्यानंत मला चुकीची माहिती मिळाल्याचं त्याने सांगितलं.
‘मला चुकीची माहिती मिळाल्यामुळे मी ते वक्तव्य केलं होतं. मात्र आमच्या इमारतीत कोणालाही करोनाची लागण झालेली नाहीये. तसंच मी केलेल्या वक्तव्यामुळे इतरांना जो मनस्ताप सहन करावा लागला त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो’, असं साहिलने व्हिडीओ शेअर करत म्हटलं.
वाचा : CoronaVirus : ‘ही’ मराठी फॅशन डिझायनर गरजूंच्या मदतीला; करणार १ कोटी ५० लाख रुपयांची मदत
दरम्यान, सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करोनाविषयी अनेक अफवा पसरताना दिसत आहे. कुत्र्यांपासून करोनाच्या विषाणूंचा प्रसार होतो, अशीही अफवा मध्यंतरी पसरली होती. मात्र चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीने सोशल मीडियावर एक प्रमाणपत्र शेअर करत या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं साहिल खान याचा कलाविश्वातील वावर कमी झाला असला तरीदेखील तो फॅशन इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. लोकप्रिय मॉडेल म्हणून आजही त्याच्याकडे पाहिलं जातं. साहिलने ‘स्टाइल’, ‘एक्सक्युज मी’, ‘यही हैं जिंदगी’, ‘डबल क्रॉस’, ‘अलादीन’ या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 24, 2020 12:51 pm