खासगी वृत्तवाहिन्यांच्या जबरदस्त स्पर्धेत सह्य़ाद्री या सरकारी वाहिनीने आपली विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. पण तिच्या जोडीने येणाऱ्या व्यावसायिकतेचं काय करायचं? ती कुठून आणणार?

बातम्या, न्यूजफीड, वृत्तवाहिन्या, संकेतस्थळं, अपडेट्स, बुलेटिन हे आपल्या दिनक्रमाचा अविभाज्य घटक झाले आहेत. सतत चहुबाजूंनी आपल्यावर बातम्यांचा मारा होत असतो. नको ते सारखं तेच तेच असं वाटूनही आपण वारंवार बघत राहतो. आपल्या आवडीनिवडीप्रमाणे बातम्यांचं चॅनेलही पक्कं असतं. २४ तास बातम्या पुरवणारी मराठी चॅनेल्स सुरू होऊन जेमतेम सात-आठ र्वष होत आहेत. बातम्यांच्या फॅक्टऱ्या अवतरण्यापूर्वी डीडी अर्थात सह्य़ाद्री वाहिनीच्या बातम्या आपला आधारवड होता. सातच्या ठोक्याला वाजणारी तालमय सिग्नेचर टय़ून (शीर्षक गीत) आणि त्यानंतर मोजून पंधरा मिनिटे चालणाऱ्या बातम्या अनेकांच्या वेळापत्रकाचा भाग होता. आता ही सिग्नेचर टय़ून व्हिंटेज दर्जा मिळून अनेकांच्या स्मार्टफोन्सची रिंगटोन झाली आहे. सह्य़ाद्री बातम्यांच्या शर्यतीत आता २४ तासांच्या किमान सहा वृत्तवाहिन्या आहेत. सह्य़ाद्री वाहिनीची चार बातमीपत्रे (सकाळी ८.३०, दुपारी २.३०, संध्याकाळी ७.०० आणि रात्री ९.३०) २४ तासांच्या वाहिन्यांना टक्कर देतात. रिअल टाइम आणि इन्स्टंट अपडेट दुनियेत कुठे आहेत या बातम्या, याचा हा गोषवारा.

पत्रकारितेच्या मूलतत्त्वांनुसार वाचकाला, प्रेक्षकाला बातमी निखळ स्वरूपात द्यावी असं शिकवलं जातं. व्ह्य़ूजरूपी न्यूज असू नये. विश्लेषणात्मक मांडणीसाठी अन्य व्यासपीठं उपलब्ध आहेत. तिथे बातमीचे बहुविध कंगोरे सादर केले जाऊ शकतात. पण हार्ड न्यूज अर्थात तत्काळ घडलेल्या घटनेची बातमी देताना त्यात लिहिणाऱ्याचे किंवा संस्थेचे मत असू नये हा सिद्धान्त. ब्रेकिंग न्यूजच्या स्पर्धेत राहण्यासाठी तसेच आर्थिक हितसंबंधापायी खासगी वाहिन्यांना भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे या बातम्या पाहताना बातमी फिरवलेली असू शकते, त्याचं नाटय़ीकरण केलेले असू शकतं, पाश्र्वसंगीताची जोड देऊन खमंगपणा आणलेला असू शकतो. गोष्टी आपल्या मनावर बिंबण्यासाठी कॅमेरा आणि ग्राफिक्सच्या करामती करून एकच दृश्य विविध कोनातून सादर केलं जातं. सह्य़ाद्री वाहिन्यांच्या बातम्यांमध्ये आपल्याला शुद्ध, निखळ बातमी पाहायला मिळते. ही या बातमीपत्रांची ताकद आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधील असंख्य वृत्तवाहिन्या स्पर्धेला असताना या बातमीपत्रांनी आपलं स्वत्व जपलं आहे.

सह्य़ाद्री वाहिनी केंद्र तसेच राज्य सरकारच्या विभागांअंतर्गत जाते. साहजिकच ज्या पक्षाचं सरकार सत्तेत आहे त्यानुसार बातम्यांमधले चेहरे बदलतात. यामुळे होतं असं की सरकारी प्रकल्पांची उद्घाटनं, भूमिपूजनं, कोनशिला, लॉन्चिंग या सगळ्याचं अधिकृत व्यासपीठ या बातम्या होतात. विशिष्ट मंत्री काहीही विशेष कारण नसताना रोज बातम्यांमध्ये दिसतात. न्यूज व्हॅल्यू अर्थात घटनेची बातमी होण्यासाठीचे निकष असा एक प्रकार असतो. खरोखरच बातमी असेल तर दाखवायला हरकत नाही, पण उगाच सरकारी कार्यक्रम, मंत्रीगणांसह लवाजमा आलेला म्हणून गोष्टी दाखवण्यात काहीच अर्थ नाही. अनेकदा हे कार्यक्रम फारच औपचारिक स्वरूपाचे असतात. त्यात पाहणीय काहीही नसतं. सरकारी माध्यम असलं तरी बातम्या विभाग स्वतंत्र काम करू शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे बुद्धिजीवी संकल्पनांपर्यंत जायची आवश्यकता नाही, पण थोडं तटस्थ राहूनही काम करता येऊ शकतं. सरकारी माध्यम आहे म्हणून सरकारवर कधीच टीका करता येणार नाही ही चौकट मोडायला हवी. कौतुक, प्रशंसा चांगलीच पण परीक्षण, टीका, सूचना, सुधारणा हे स्वतंत्रपणे पाहिलं तरच होऊ शकते.

आपल्या डोक्यात काही गोष्टी फिट्ट असतात. संध्याकाळी सात म्हणजे सह्य़ाद्रीवरच्या बातम्या हे समीकरण असंच काहीसं. अनेक जण आपलं घडय़ाळ त्यानुसार सेट करतात. पण हल्ली या बातम्या ७.०७ मिनिटांनी लागतात आणि ७.२१ला संपतात. त्यातही मध्ये सव्वातीन मिनिटं ब्रेक असतो. एकीकडे अष्टौप्रहर २४ तासांच्या वृत्तवाहिन्यांचा सुकाळ होत असताना सह्य़ाद्रीचं सगळ्यात लोकप्रिय वार्तापत्र आटलं आहे. इंटरनेटच्या प्रसारानंतर, माहिती बदाबदा आपल्यासमोर येते. काय वाचू आणि काय पाहू अशी स्थिती असताना, बातम्यांची टंचाई हे कारण असूच शकत नाही. वेळ घटलेल्या वार्तापत्रात काही मिनिटं हवामानाचं ग्राफिक्स येतं. अगदी आता आतापर्यंत या यादीत गोव्याची राजधानी असलेल्या पणजीचं हवामान दिसायचं. राज्यातले असंख्य जिल्हे उपलब्ध असताना पणजीचा सोस कशासाठी?

– ‘प्रतिपादन केले आणि बोलत होते’ हे दोन शब्द सह्य़ाद्री बातम्यांमधले परवलीचे शब्द आहेत. फुटकळ कार्यक्रम असतो. अमूक पालकमंत्री यांनी असे प्रतिपादन केले किंवा अमूक उद्घाटनप्रसंगी राज्यमंत्री बोलत होते. ज्या ठिकाणी सन्माननीय गृहस्थ बोलले तो कार्यक्रम आणि ज्या गृहस्थांनी प्रतिपादन केलं ते या दोन्हींमध्ये काहीही बातमी नसते. खासगी वृत्तवाहिन्यांवर असल्या बातम्या तुम्हाला चुकूनही दिसणार नाहीत. पण सह्य़ाद्री वाहिनीवरच्या बातम्यांत हमखास असतं हे. दखल घ्यावी अशा अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतात. पण ते सोडून हे का ऐकावं लोकांनी?

– अगदी आठवडाभरापूर्वीची गोष्ट. भारताचा माजी क्रिकेटपटू इक्बाल सिद्दिकी यांच्या हस्ते नगरमध्ये एका क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं. त्याची बातमी दाखवली गेली. एका कसोटीचा टिळा लागलेले सिद्दिकी यांचं योगदान नाकारण्याचा प्रश्न नाही. पण राज्यातल्या प्रत्येक जिल्हा, तालुक्यात क्रिकेट स्पर्धा होत असतात आणि कोणत्या ना कोणत्या माजी क्रिकेटपटूंच्या हस्ते त्याचं उद्घाटन होतं. मग केवळ जागा भरो म्हणून असलं काहीतरी का दाखवावं. आणि बरं ज्या स्पर्धेचं उद्घाटन झालं ती प्रचंड ऐतिहासिक वगैरे काहीच नाही. सिद्दिकी खेळपट्टीवर नारळ वाढवत असताना आजूबाजूला जेमतेम वीस माणसंसुद्धा नव्हती. हे राज्यभर जाणारं वार्तापत्र आहे याची जाणीवच दिसत नाही. अनेकदा बातमी सांगितली जाते, व्हिडीओ सुरू होतो. कॅमेरा पॅन होऊन प्रेक्षकांमध्ये जातो तर त्या बाळबोध स्वरूपाच्या कार्यक्रमाला दहा माणसंही दिसत नाहीत. अनेक चांगल्या कार्यक्रमांना उपस्थिती नसते हे सत्य आहे, पण रुटिन स्वरूपाच्या कार्यक्रमावर वेळ आणि ऊर्जा खर्च करण्याची काहीच गरज नाही. साधारण वर्षभरापूर्वी पाकिस्तानमधल्या पेशावर येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत दीडशेहून अधिक मुलं, शिक्षक, कर्मचारी यांनी जीव गमावला. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या दिवशीची हेडलाइन बातमी होती ती, कारण घटनेची तीव्रता आणि गांभीर्य तितकं होतं. सह्य़ाद्री वाहिनीच्या एका वार्तापत्रात ही पाचवी हेडलाइन होती. आणि चार मामुली दर्जाच्या बातम्या सांगितल्यावर ही बातमी घेण्यात आली. आता या प्राधान्यक्रमावर काय बोलणार..

– बातमी घडलेल्या प्रत्येक ठिकाणी माणूस जाणं शक्य नसतं. साहजिकच दिल्लीस्थित मुख्य केंद्राकडून व्हिडीओ फुटेज घेऊन दाखवलं जातं. खासगी मराठी वृत्तवाहिन्याही आपापल्या हिंदीभाषिक किंवा इंग्रजीभाषिक मुख्य वाहिनीकडून फुटेज उचलतात. सह्य़ाद्री वाहिन्यांवरच्या बातम्यांमध्ये हे फुटेज उचलतानाही गफलत असते. डीडी न्यूज या वाहिनीचं फुटेज उचललं जातं. यात डावीकडे डीडी न्यूजचा प्रचंड लोगो दिसतो. खाली डीडी न्यूजवरच्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतले टिकर अर्थात वृत्तपट्टय़ा दिसतात. काही वेळेला त्यांच्या अँकरचं दर्शन होतं आणि व्हॉइसओव्हरही ऐकायला येतं. थोडक्यात अन्य मराठी वाहिन्या केवळ व्हिडीओ घेतात. बाकी गोष्टी त्यांची माणसं करतात. सह्य़ाद्री वाहिनी डीडी न्यूजची बातमी घेऊन ती दाखवतात. म्हणजे मराठी बातम्यांत त्या विशिष्ट बातमीसाठी डीडी न्यूजची बातमी दिसते असा प्रकार. तुम्ही काळजीपूर्वक पाहिलंत तर तेवढय़ा मिनिटांसाठी आपण डीडी न्यूज हिंदी वाहिनीवरच्या बातम्या पाहतोय असंच वाटतं. हे टाळता येऊ शकतं. असल्या गोष्टींमुळे रसभंग होतो.

– खासगी वृत्तवाहिन्यांच्या सुळसुळाटामुळे वृत्तनिवेदक आता न्यूज प्रेझेंटर झाला आहे. निवेदक हा माध्यम असतो, ज्याद्वारे आपण बातम्या पाहतो, ऐकतो. निवेदकाचं व्यक्तिमत्त्व प्रसन्न, आकर्षक असावं ही अपेक्षा योग्यच आहे. कॅमेऱ्याच्या लेन्स, प्रकाशयोजना, स्टुडिओतील क्रोमा यानुसार कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत याचे काही संकेत आहेत. साडीचा रंग आणि पोत कितीही चांगला असला तरी तांत्रिक कारणांमुळे पडद्यावर पाहताना काही गोष्टी डोळ्याला खटकतात. एरव्ही साधारण वाटणारे काही कपडे पडद्यावर प्रचंड गडद, बटबटीत दिसतात. निवेदकाने प्रेक्षकांना बातमीपर्यंत घेऊन जाणे अपेक्षित आहे. मात्र निवेदकाच्या कपडय़ांच्या रंगांनी विचलित होऊन चॅनेल बदलावासा वाटणं मोठीच नामुष्की आहे. जे कपडय़ांचं ते मेकअपलाही लागू आहे.

-हेडलाइन्स सुरू असताना, व्हिडीओ आणि त्याखालची कॅप्शन यांचा मेळ साधत नाही. नुकतीच दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा झाली. यादरम्यानच्या एका बातमीपत्रात भारतीय मुष्टियुद्धपटूंना पदके अशी हेडलाइन होती. व्हिडीओत आधी हॉकीपटू आणि नंतर नेमबाज दिसले. बॉक्सिंगचा ‘ब’ही दिसला नाही. अनेकदा टेलिप्रॉम्पटरचा घोळ जाणवतो. व्हिडीओ आणि बोलायचं आहे ते वेगळं आहे जाणवल्याने निवेदक पडद्यामागच्या मंडळींना हातवारे करून जाब विचारत असल्याचंही दिसलेलं आहे.

-खासगी वाहिन्यांच्या कॅमेऱ्याच्या प्रवेशाला मर्यादा असतात. अनेक ठिकाणी त्यांना मज्जाव केला जातो. पण सह्य़ाद्री सरकारी वाहिनी असल्याने ते मुक्तपणे गोष्टी टिपू शकतात. सनसनीखेज गौप्यस्फोट, टीआरपी खेचक काही नको, पण समाजात सामान्य माणसांना नाडणाऱ्या असंख्य गोष्टी सुरू असतात. त्यांच्या व्यथा, संघर्ष, टोकदारपणे का समोर येत नाहीत?

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच एक ग्राफिक्स प्रसिद्ध झालं होतं. सगळ्या वृत्तवाहिन्यांच्या स्पर्धेत सह्य़ाद्री वाहिन्यावरच्या बातम्या अव्वलस्थानी आहेत. या ग्राफिक्सच्या सत्यतेविषयी कल्पना नाही. मात्र आजही सह्य़ाद्री वाहिनीवरच्या बातम्या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातलं साधेपण आणि खरेपणा लोकांना भावतो. आक्रस्ताळ्या चॅनेलीय चर्चापेक्षा साडेनऊच्या बातम्यांमध्ये येणाऱ्या पाहुण्याशी गप्पा समृद्ध करणाऱ्या असतात. म्हणूनच सह्य़ाद्रीवरची बातमीपत्रं प्रेक्षक आवर्जून पाहतात. याच बातम्या थोडय़ा व्यावसायिक झाल्या तर प्रेक्षकांना सर्वसमावेशक बातम्या पाहिल्याचं समाधान मिळेल.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com