गोरा रंग, नितळ त्वचा या गोष्टींना फार महत्त्व दिलं जातं. त्यातही तुम्ही जर चित्रपटसृष्टीत असाल तर सुंदरतेलाच प्राधान्य दिलं जातं. मात्र या सर्व संकल्पनांना छेद देत एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने सौंदर्याची एक नवीन परिभाषा मांडली आहे. ‘प्रेमम’ या मल्याळम चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री साई पल्लवी हिने आत्मविश्वाच हेच खरे सौंदर्य असल्याचं म्हटलं आहे.

‘प्रेमम’ प्रदर्शित झाला तेव्हा साईचा डी-ग्लॅम लूक फार चर्चेत होता. साई पल्लवीचा मुरुमाने भरलेला चेहरा, तेलकट चेहरा, मेकअप नसलेली अभिनेत्री म्हणूनच ओळख झाली होती. तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटात तिने प्रमुख भूमिका तर साकारल्या पण आता तिने आघाडीच्या अभिनेत्रींमध्येही स्थान मिळवलं आहे.

https://www.instagram.com/p/Bv9Gj0unf8s/

तिच्या चेहऱ्यावर मुरूम होते. पण तरीसुद्धा प्रेक्षकांनी मला स्वीकारलं आणि भरभरून प्रेम दिलं, असं ती सांगते. आगामी चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत साई म्हणाली, ‘जेव्हा लोकांनी मला मी जशी आहे तसं स्वीकारलं, मला माझ्या चेहऱ्यावरील मुरुमांसह स्वीकारलं, तेव्हा मला जाणीव झाली की आत्मविश्वास हेच खरं सौंदर्य असतं.’

https://www.instagram.com/p/BX4beYAgvQJ/

काही दिवसांपूर्वी साईने फेअरनेस क्रीमच्या कोट्यवधी रुपयांच्या जाहीरातीची ऑफर नाकारली होती. ‘मी स्वत: सौंदर्य प्रसाधनांना पाठीशी घालत नाही. तुम्ही स्वत:विषयी, त्वचेच्या रंगाविषयी आत्मविश्वास बाळगायला हवा,’ असं मत तिने मांडलं होतं. त्वचेच्या रंगाला महत्त्व देणाऱ्यांसाठी ही साई पल्लवीची चांगलीच चपराक होती.